Padmashali Samaj Nagar | ४५० स्पर्धकांचा उत्स्फूर्त सहभाग; ३० सप्टेंबरला होणार बक्षीस वितरण







नगर : दर्शक । पद्मशाली सोशल फाउंडेशन ट्रस्टच्या वतीने गणेशोत्सवानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या विनामूल्य निबंध स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शहरातील विविध शाळांमधील तसेच शहराच्या विविध भागांतून आलेल्या सुमारे ४५० स्पर्धकांनी या निबंध स्पर्धेत सहभाग नोंदविला. विद्यार्थ्यांच्या लेखनकौशल्याला वाव मिळावा, तसेच गणेशोत्सवाच्या सामाजिक, सांस्कृतिक व पर्यावरणीय पैलूंवर विचारमंथन व्हावे, या उद्देशाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.




      इयत्ता ५वी ते ७वी तसेच इयत्ता ८वी ते १०वी या दोन गटांमध्ये मिळून सुमारे ३७० स्पर्धकांनी सहभाग घेतला. तर खुल्या गटातील स्पर्धेत सुमारे ८० स्पर्धकांनी सहभाग नोंदविला. अशा प्रकारे एकूण ४५० स्पर्धकांनी स्पर्धेत सहभाग घेत आपल्या लेखनकौशल्याचा परिचय करून दिला. शहरातील विविध भागांतील शाळांमधून तसेच नागरिकांमधूनही या उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळाला. स्पर्धेच्या ठिकाणी विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण होते.




       यावेळी बोलताना पद्मशाली सोशल फाउंडेशनचे अमोल गुंडू म्हणाले की, विद्यार्थ्यांच्या लेखनकौशल्याला वाव मिळावा तसेच गणेशोत्सवाच्या सामाजिक, सांस्कृतिक व पर्यावरणीय पैलूंवर विद्यार्थ्यांसह नागरिकांनी विचारमंथन करावे, या उद्देशाने निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेला मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता हा उपक्रम यशस्वी झाला असून भविष्यातही विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देणारे विविध उपक्रम राबविण्यात येतील, असे त्यांनी सांगितले.



       या स्पर्धेचे बक्षीस वितरण बुधवार, दि. ३० सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ११ वाजता श्री मार्कंडेय शैक्षणिक संकुल, दातरंगे मळा, नेप्ती नाका जवळ, अहिल्यानगर येथे होणार आहे.



       स्पर्धेचे आयोजन यशस्वी करण्यासाठी पद्मशाली सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष गणेश लकशेट्टी, अजय लयचेट्टी, अमोल गुंडू, श्रीनिवास बुरगुल, राजेंद्र बुलबुले, मयूर जिंदम आदींनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीनिवास बुरगुल यांनी केले, तर आभार प्रदर्शन गणेश लकशेट्टी यांनी मानले.