Crime News Nagar |  बीएसएनएल बॉक्स फोडून वायर चोरीचा प्रयत्न; पोलिसांनी एकाला पकडले

Crime News Nagar | बीएसएनएल बॉक्स फोडून वायर चोरीचा प्रयत्न; पोलिसांनी एकाला पकडले






Crime News Nagar | नगर शहरातील नगर-मनमाड रोडवरील सांबर हॉटेल परिसरात बीएसएनएलच्या बॉक्समधून वायर चोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका चोरट्याला तोफखाना पोलिसांच्या बीट मार्शलच्या पथकाने पाठलाग करून रंगेहात पकडले आहे. तर एक जण पसार झाला आहे. या कारवाईत पोलिसांनी ३० हजारांची दुचाकी आणि एक वॅक्स पान जप्त केले असून, याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.




तोफखाना पोलीस ठाण्यात कार्यरत पो. कॉ. अनिल रोकडे (वय ३३) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. १८ सप्टेंबर रोजी रात्री फिर्यादी रोकडे व पो.कॉ. किरण उकिर्डे गणेशोत्सवाच्या अनुषंगाने सिद्धार्थनगर आणि बोरुडे मळा परिसरात पेट्रोलिंग करत होते. १९ सप्टेंबर रोजी पहाटे ३.४५ वाजण्याच्या सुमारास नगर-मनमाड रोडवरील सांबर हॉटेल परिसरात दोन इसम चोरी करण्याचा प्रयत्न करत असून



पोलिसांची मदत हवी असल्याचा कॉल 'डायल ११२ वरून आला. या कॉलच्या आधारे पोलीस त्वरित त्या ठिकाणी पोहोचले. तेव्हा बॉक्सपासून दोन इसम पळू लागले. पोलिसांनी पाठलाग करून एकाला जागीच पकडले. त्याचे नाव साहिल सुनील पवार (वय १९, रा. बोरुडे मळा, बालिकाश्रम रोड, अ.नगर) असून त्याची झडती घेतली असता त्याच्याकडून २०० रुपये किमतीचे एक वॅक्स पान आणि हिरो स्पेंडर मोटरसायकल (क्र. एमएच १६ एडी ६१२६ ) असा एकूण ३० हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.



पोलिसांनी चौकशी केली असता पळून गेलेल्या इसमाचे नाव ओकार किशोर घोरपडे (रा. सिद्धार्थनगर, बौद्ध वस्ती, अ.नगर) असून जप्त केलेली हिरो स्पेंडर गाडी त्याचीच असल्याचे साहिलने सांगितले. रात्रीच्या वेळी लपूनछपून चोरीच्या उद्देशाने फिरणाऱ्या या इसमाविरुद्ध तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.