Rahuri News | सावित्रीबाई फुले विद्यालयात सीईओ विक्रम बोऱ्हाडे यांची भेट; सायन्स पार्क उभारणीस सहकार्याचे आश्वासन
Rahuri News | राहुरी : दर्शक । सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालयात सिंजेंटा फाउंडेशन इंडियाच्या सहकार्याने राबविण्यात येत असलेल्या ‘माझा आवडता विषय’ या अभिनव उपक्रमाला सिंजेंटा फाउंडेशनने पाठबळ दिले आहे.
या उपक्रमाची पाहणी व विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यासाठी सिंजेंटा फाउंडेशन इंडियाचे सीईओ विक्रम बोऱ्हाडे यांनी विद्यालयास भेट दिली.
‘माझा आवडता विषय’ उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीनुसार विविध विषयांचे स्वतंत्र शैक्षणिक बॅचेस उपलब्ध करून देण्यात आले आहेत. विद्यार्थ्यांच्या आवडी, क्षमता आणि शैक्षणिक गरजा लक्षात घेऊन त्यांना शिकण्याच्या अधिक संधी उपलब्ध करून देणे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.
यावेळी सावित्रीबाई फुले शिक्षण मंडळाचे सचिव डॉ. महानंद माने उपस्थित होते. विक्रम बोऱ्हाडे व डॉ. महानंद माने यांनी विद्यार्थ्यांशी मनमोकळा संवाद साधला. ‘माझा आवडता विषय’ तसेच ‘आनापान’ उपक्रमाबाबत विद्यार्थ्यांचे अनुभव जाणून घेत त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनीही उत्स्फूर्त सहभाग नोंदवत आपल्या अनुभवांची माहिती दिली.
कार्यक्रमाच्या आभार प्रदर्शनात विद्यालयाचे मुख्याध्यापक अरुण तुपविहिरे यांनी सिंजेंटा फाउंडेशन व विक्रम बोऱ्हाडे यांचे विद्यालयाच्या वतीने आभार मानले. विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन, जिज्ञासा आणि प्रयोगशीलता विकसित करण्यासाठी विद्यालय परिसरात ‘सायन्स पार्क’ उभारण्याची मागणी त्यांनी यावेळी केली.
या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत विक्रम बोऱ्हाडे यांनी सायन्स पार्क उभारणीसाठी संपूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. त्यामुळे विद्यार्थ्यांना विज्ञानातील विविध संकल्पना प्रत्यक्ष प्रयोग, कृती आणि निरीक्षणाच्या माध्यमातून समजून घेण्यासाठी एक प्रभावी व्यासपीठ उपलब्ध होणार आहे.
कार्यक्रमास विद्यालयाचे मुख्याध्यापक अरुण तुपविहीरे उपमुख्याध्यापक बाळासाहेब डोंगरे, पर्यवेक्षक मनोज बावा, प्रा. जितेंद्र मेटकर, विज्ञान शिक्षक हलीम शेख यांच्यासह शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.
-----------------------------------------------
वृत्त-जावेद शेख
प्रसिद्धी सहयोग-समता मीडिया सर्व्हिसेस,श्रीरामपूर


0 टिप्पण्या
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com