डी.एड.च्या माजी विद्यार्थ्यांचा 40 वर्षांनंतर स्नेहमेळावा - जुन्या आठवणींना उजाळा, मैत्रीचा आनंद द्विगुणित 






भंडारदर्‍याच्या निसर्गरम्य वातावरणात 1984-86 च्या तुकडीतील शिक्षक पुन्हा एकत्र



नगर - युनियन अध्यापक विद्यालयात 1984 ते 1986 या कालावधीत डी.एड.चे शिक्षण घेतल्यानंतर राज्याच्या विविध भागांत शिक्षक म्हणून सेवा बजावलेल्या माजी विद्यार्थ्यांचा तब्बल 40 वर्षेसहा महिन्यांनंतर भंडारदरा येथे स्नेहमेळावा नुकताच उत्साहात पार पडला. वयोमानानुसार सेवानिवृत्त झालेल्या या शिक्षकांनी एकत्र येत जुन्या आठवणींना उजाळा दिला. निसर्गरम्य वातावरणात मित्रांसोबत घालवलेल्या क्षणांमुळे सर्वांच्या चेहर्‍यावर आनंद ओसंडून वाहत होता.



अहिल्यानगर येथील युनियन अध्यापक विद्यालयाच्या 1984-86 च्या तुकडीतील विद्यार्थी डी.एड.चे शिक्षण पूर्ण केल्यानंतर राज्याच्या विविध भागांत शिक्षक म्हणून रुजू झाले होते. त्या काळात गुणवत्तेच्या आधारे डी.एड.ला प्रवेश मिळत असल्याने राज्याच्या वेगवेगळ्या भागांतून विद्यार्थी शिक्षणासाठी आले होते. पुढे अनेकांनी आपल्या अध्यापन कार्यातून विद्यार्थ्यांना घडविण्याचे महत्त्वपूर्ण काम केले. काही जण शिक्षक, मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख, तर काही विस्तार अधिकारी अशा विविध पदांवर कार्यरत राहिले. प्रदीर्घ शैक्षणिक सेवा बजावल्यानंतर हे सर्वजण सेवानिवृत्त झाले.


काळाच्या ओघात प्रत्येक जण आपापल्या कामात आणि संसारात व्यस्त झाला. मात्र, मोबाईल आणि संपर्काच्या माध्यमातून मित्र पुन्हा एकमेकांच्या जवळ आले. त्यातूनच स्नेहमेळाव्याची संकल्पना पुढे आली. दैनंदिन व्यापातून वेळ काढत सर्वांनी या उपक्रमात उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. भंडारदरा येथील वसंतसुत हॉटेलमध्ये झालेल्या या मेळाव्यात जुन्या वर्गमित्रांनी शैक्षणिक जीवनातील आठवणी, शिक्षक म्हणून केलेला प्रवास आणि आयुष्यातील सुख-दुःखाचे अनुभव एकमेकांशी मनमोकळेपणाने शेअर केले. चार दशकांनंतर पुन्हा एकत्र आल्याने जणू महाविद्यालयीन जीवनातील दिवस पुन्हा अनुभवायला मिळाले.


- मैत्रीचा धागा कायम ठेवण्याचा संकल्प
आयुष्याच्या या टप्प्यावर पुन्हा एकत्र येण्याची संधी मिळाल्याने सर्वांनी समाधान व्यक्त केले. आयुष्याच्या उत्तरार्धातील हे क्षण म्हणजे परमेश्‍वराने दिलेली अनमोल भेट असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. या स्नेहमेळाव्यामुळे जुन्या मैत्रीला नव्याने उजाळा मिळाला असून, दरवर्षी असा मेळावा आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला.


या मेळाव्यात सुरेंद्र हातवळणे, वसंतराव लोखंडे, तुकाराम वारकड, नामदेवराव पतंगे, सुधाकर शेटे, सुनील बोंडगे, दत्तात्रय मैड, संपत गायकर, भीमराव आंबरे, रामनाथ भालेकर, विष्णू तागड, रामराव ढाकणे, शरदराव सुद्रिक, वाल्मिक शिंदे, दिनकर पारधी, मारुती गायकवाड, शिवाजी नागरे, अशोक विटनोर, आयुब इनामदार, योसेफ मकासरे, रावसाहेब चौधरी, वैजनाथ कर्डिले, रभाजी सोनवणे, अण्णासाहेब खतोडे, शिवाजी ठुबे आणि रावसाहेब सोनवणे सहभागी झाले होते.


मेळाव्याच्या यशस्वितेसाठी सुधाकर शेटे, वसंत लोखंडे, नामदेव पतंगे, रामनाथ भालेकर यांच्यासह सहकारी मित्रपरिवाराने विशेष परिश्रम घेतले. पुढील वर्षी पुन्हा एकदा स्नेहमेळावा घेण्याचा निर्धार करत सर्वांनी आनंदाने एकमेकांचा निरोप घेतला.