APJ Abdul Kalam | न्यू आर्ट्स महाविद्यालयात ‘वाचन प्रेरणा दिन’ साजरा





नवीन पुस्तकांचे प्रदर्शन; स्पर्धा परीक्षांसाठी ग्रंथालयातील साहित्याचा लाभ घेण्याचे प्राचार्य डॉ. बाळासाहेब सागडे यांचे आवाहन

APJ Abdul Kalam |  नगर : दर्शक ।  न्यू आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स महाविद्यालय (स्वायत्त), अहिल्यानगर येथे ग्रंथालय विभागाच्या वतीने डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त वाचन प्रेरणा दिन साजरा करण्यात आला. यानिमित्त महाविद्यालयात नवीन पुस्तकांचे प्रदर्शन भरविण्यात आले होते. कार्यक्रमाचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बाळासाहेब सागडे यांच्या हस्ते झाले.



        यावेळी प्राचार्य डॉ. सागडे यांनी महाविद्यालयाच्या ग्रंथालयातील विपुल ग्रंथसंपदेची माहिती दिली. ग्रंथालयात लाखो ग्रंथ आणि संदर्भग्रंथ उपलब्ध असून, विषयानुसार पुस्तकांची मांडणी करण्यात आली आहे. संदर्भसाहित्य विभागात शब्दकोश, विविध विषयांचे ज्ञानकोश, विश्वकोश, मार्गदर्शिका तसेच दुर्मिळ वाचनसाहित्याचा समावेश आहे. या साहित्याचा विद्यार्थ्यांनी अभ्यासासाठी, ज्ञानार्जनासाठी आणि विशेषतः स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी अधिकाधिक उपयोग करून घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.



         वाचनामुळे ज्ञानाच्या कक्षा रुंदावतात आणि व्यक्तिमत्त्व विकासाला चालना मिळते. विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी, त्यांना नव्या पुस्तकांची ओळख व्हावी आणि अभ्यासासाठी संदर्भसाहित्य उपलब्ध व्हावे, या उद्देशाने नवीन पुस्तकांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. या उपक्रमातून विद्यार्थ्यांना विविध विषयांवरील पुस्तकांची माहिती मिळाली.



       कार्यक्रमास वाणिज्य शाखेचे उपप्राचार्य डॉ. संजय कळमकर, विज्ञान शाखेचे उपप्राचार्य डॉ. अनिल आठरे, ग्रंथपाल संगीता निमसे, प्रबंधक बबन साबळे, अधीक्षक आर. एन. पाटील, अधीक्षक जे. जी. सावळे यांच्यासह महाविद्यालयातील विविध विभागांचे प्राध्यापक, प्रशासकीय कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते.


         कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी सविता डांगे, चेतन साळवे, श्रीराम बनसोड, विजय म्हस्के, के. एन. मते तसेच ग्रंथालयातील इतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.