तुळजाभवानी मातेचे नगरमधील पालखीमधून सीमोल्लंघन
नगर-तुळजापूर येथील नवरात्र उत्सव काळात मूर्तीला पालखीमधून सीमोल्लंघन केले जाते.छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भोसले घराण्यासह राज्यातील अनेकांचे कुलदैवत असलेल्या कुलस्वामिनीच्या मंदिरातील प्रथा-परंपरा शेकडो वर्षांपासून आजही भक्तिभावाने अखंडपणे जोपासल्या जात आहे.हि पालखी पुरवण्याचा मान अहमदनगर शहराला लाभला आहे.अशी माहिती मानकरी सागर भगत यांनी दिली.
तुळजापूरच्या तुळजाभवानी मातेला लागणारा पालखी घेऊन येण्याचा मान नगर तालुक्यातील बु-हाणनगर गावाला आहे. येथील रहिवासी भगत यांना पालखीचा मान मिळालेला आहे. सीमोल्लंघन यासाठी हीच मूर्ती पालखीत ठेवून मुख्य मंदिराभोवती मिरविली जाते. विशेष म्हणजे पालखी सीमोल्लंघनानंतर लगेचच तोडून होमात टाकली जाते. पलंग-पालखी वेगवेगळ्या जागी तयार होऊन तुळजापूरपर्यंत पोहचतात.पालखी तयार होण्यापासून ते शेवटपर्यंत हा सर्व प्रवासच अनोखा आहे.
तुळजाभवानीची मूळ मूर्ती काढून पलंगावर झोपवली जाते. दरवर्षी सीमोल्लंघन खेळण्याकरिता मूर्तिला पालखीतून मुख्य मंदिर परिसरातून प्रदक्षिणा काढून मिरवले जाते. ही पालखी आणण्याचा मान अहमदनगर शहरालगत असणा-या बु-हाणनगर गावातील भगत नावाच्या एका तेली घराण्याकडे आहे.
पालखी तयार करण्याची कथाही काही वेगळीच आहे. त्यानुसार तुळजाभवानीच्या दरबारात पालखी आणून ती मिरविण्याचा मान जरी भिंगारच्या तेली घराण्याला आहे. फार पूर्वी तुळजाभवानीची पालखी नगरजवळील हिंगणगावला तयार व्हायची.
पुढे अहिल्यादेवी होळकरांच्या घोगरे नावाच्या सरदारांनी पालखी तयार करण्याचा मान स्वत:कडे घेऊन आपले जहागिरीचे ठिकाण असणा-या राहुरीत ती तयार करण्याची प्रथा सुरू केली. पालखीच्या तयारीतही अनेक मानकरी आहेत. त्यानुसार दरवर्षी भाद्रपद प्रतिपदेला पालखीसाठी लागणारे लाकूड राहुरीच्या म्हेत्रे म्हणजे माळी घराण्याकडून येते. कदमांकडून पालखीसाठीचे उभे लाकूड ज्याला शिपाई म्हटले जाते तेच फक्त देण्यात येते.
पालखीच्या खालच्या बाजूला बोरीचे लाकूड तर इतर लाकूड पूर्णपणे सागवानाचे असते. ते राहुरीतील पटेल सॉ मिलवाले द्यायला लागले. खांद्यासाठीचा मोठा दांडा असतो तो जुनाट वापरला जातो. पालखीचे लाकूड मिळाल्यानंतर ती तयार करण्याचा मान राहुरीतील कै. उमाकांत सुतारांच्या घराण्याला आहे.
यावेळी लाकडाची कतई करण्याचे काम धनगर समाजातील भांड घराणे करते. तर लोहाराचे रणसिंग घराणे खिळेपट्टी करते. अशा रीतीने पालखी तयार झाली की तिची सुताराकडून विधिवत पूजा करून तेली समाजातील धोत्रे घराणे पालखीला राहुरीतील तुळजाभवानी मंदिरात घेऊन जातात.
यावेळी दिवे कुंभार पुरवितात तर तेली तेल देतात. खाली घोंगडी अंथरण्याचे काम धनगर सगाज करतात. राहुरीतील तुळजाभवानी मंदिराकरिता धोंडीबा घोगरे यांनी स्वत:ची जागा दान केलेली आहे. देवीचे पुजारीपण धोत्रे नावाच्या तेली बांधवाकडे आहे.
सुपा, पारनेर, हिंगणगाव, नगरमार्गे ४० गावांतून तिस-या माळेला पालखी भिंगार गावात दाखल होते. घटस्थापनेच्या तिस-या दिवशी भिंगारमध्ये पलंग-पालखीची अभूतपूर्व भेट झाल्यानंतर दोन्ही तुळजापूरच्या दिशेने रवाना होतात. पालखी टेकविण्याकरिता तुळजापुरातील शुक्रवार पेठेत स्वतंत्र ओट्याची व्यवस्था केलेली आहे.
रात्री उशिरा पालखीची तुळजापूर गावातून स्वतंत्रपणे मिरवणूक निघते. अगदी पहाटेच्या सुमारास पालखी तुळजाभवानी मंदिरात दाखल होतात. देवीचे सीमोल्लंघन हे दस-याच्या दुस-या दिवशी पहाटे सूर्योदयाबरोबर होत असल्याने मंदिरात प्रचंड गर्दी होत असते. याच वेळी मंदिरातील भोपे पुजारी देवीला १०८ साड्यांचे वेष्टन गुंडाळून पालखीत ठेवतात.
देवीची एक प्रदक्षिणा पूर्ण झाल्यानंतर पालखीतून उचलून देवीला पलंगावर झोपविण्यात येते. तेव्हा हा पलंग देवीच्या मुख्य गाभाऱ्यात ठेवण्यात येतो. पालखीची मिरवणूक झाली की अगदी विधिपूर्वक त्याचे वरचे दांड काढून पालखी मोडून होमात टाकली जाते.
तुळजाभवानी मंदिरातील पालखीचे वैशिष्ट्य म्हणजे या दोन्ही वस्तू एकदा वापर झाल्या की त्या विधिपूर्वक व सन्मानपूर्वक तोडून होमात टाकून जाळून टाकल्या जातात. त्याची राख देवीच्या मूर्तिला लावल्याखेरीज नित्य पूजा संपन्न होत नाही हे वैशिष्ट्य आहे

0 टिप्पण्या
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com