धम्मग्रंथ वाचन, सामाजिक प्रबोधन व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन




नगर : दर्शक ।  बौद्ध संस्कार संघ, अहिल्यानगर यांच्या वतीने बौद्धधर्मीय वर्षावास समारोप सोहळ्याचे आयोजन रविवार, २५ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६ ते रात्री ९ या वेळेत चेतना लॉन्स, छत्रपती संभाजीनगर रोड, अहिल्यानगर येथे करण्यात आले आहे. या सोहळ्यात धार्मिक, सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे, अशी माहिती बौद्ध संस्कार संघाचे भाऊसाहेब देठे यांनी दिली.


         वर्षावासाच्या चार महिन्यांच्या कालावधीत ‘बुद्ध आणि त्यांचा धम्म’ या पवित्र ग्रंथाचे वाचन व प्रबोधन करण्यात आले. या धार्मिक उपक्रमाच्या समारोप सोहळ्यास भंते धम्मपाल यांची उपस्थिती लाभणार आहे. भगवान गौतम बुद्धांचे विचार, धम्माचे महत्त्व आणि त्यातून मिळणारी मानवतावादी शिकवण यांचा प्रसार या कार्यक्रमाच्या माध्यमातून करण्यात येणार आहे.



      या सोहळ्यास वरिष्ठ रिपब्लिकन नेते, समाजभूषण (महाराष्ट्र शासन) पुरस्काराचे निर्माते काकासाहेब खंबाळकर यांची प्रमुख उपस्थिती राहणार असून, ते सामाजिक कार्याबाबत मार्गदर्शन करणार आहेत. तसेच सन २०२१-२२ मध्ये महाराष्ट्र शासनाच्या समाजभूषण पुरस्काराने गौरविण्यात आलेले समाजभूषण परिमल ज. निकम यांचा पुनश्च सन्मान व गौरव करण्यात येणार आहे. वरिष्ठ रिपब्लिकन चळवळीचे नेते श्रीकांत भालेराव आणि ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अगस्ती बनसोडे यांचीही उपस्थिती असणार आहे.



       कार्यक्रमाच्या सांस्कृतिक सत्रात बाल उपासक आणि महिला उपासिका यांच्याकडून भगवान गौतम बुद्धांच्या जीवनावर आधारित सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात येणार आहेत. बुद्धांच्या जीवनातील प्रेरणादायी प्रसंग, त्यांची शिकवण आणि सामाजिक समतेचा संदेश या माध्यमातून उपस्थितांसमोर मांडण्यात येणार आहे.



        वर्षावास समारोप सोहळ्याच्या आयोजनासाठी विविध संस्था आणि व्यावसायिकांनी प्रायोजक म्हणून सहकार्य केले आहे. यामध्ये ट्रीपवर्स क्युरेशन, जगन्नाथन फुड्स, द केकर्स, न्यू इंडस्ट्रियल प्रॉडक्ट्स, स्मार्ट ड्रेपरी, परिहार व्यसनमुक्ती पुनर्वसन आणि मानसिक आरोग्य केंद्र, मी राजहंस लर्निंग डेव्हलपमेंट अँड थेरपी सेंटर फॉर चिल्ड्रेन, कोहिनूर एज्युकेशन हब, विवा अँड सन्स पेट्रोलियम, महादेव इंजिनिअर्स अँड गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर्स, फोनेक्स इंडस्ट्रीज, हॉटेल सह्याद्री पॅलेस आणि माऊली फुटवेअर यांचा समावेश आहे.



        धार्मिक प्रबोधनासोबतच सामाजिक बांधिलकी, समता, बंधुता आणि मानवतेचा संदेश देणारा हा वर्षावास समारोप सोहळा होणार असून, बौद्ध बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन बौद्ध संस्कार संघाच्या वतीने करण्यात आले आहे.