शिक्षण  विचारशील, आत्मनिर्भर बनविण्याचे माध्यम आहे हा संदेश सरसय्यद अहमद खान यांच्या कार्यातून मिळतो - प्रो.नवेद बिजापूरे





 

नगर : दर्शक । सर सय्यद अहमद खान यांनी समाजाला शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले. शिक्षण हे केवळ नोकरी मिळविण्याचे साधन नसून माणसाला विचारशील, आत्मनिर्भर आणि प्रगत बनविण्याचे माध्यम आहे, हा संदेश त्यांच्या कार्यातून मिळतो.



त्यांनी आधुनिक विज्ञान, इंग्रजी शिक्षण आणि सामाजिक सुधारणांना प्रोत्साहन दिले. त्यांच्या मते, समाजाची खरी प्रगती ही शिक्षण आणि ज्ञानाच्या बळावरच होऊ शकते. आजच्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या विचारांतून प्रेरणा घेऊन चांगले शिक्षण घ्यावे, वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करावा आणि देशाच्या प्रगतीसाठी योगदान द्यावे.



सर सय्यद अहमद खान यांचे जीवनकार्य आजही विद्यार्थ्यांसाठी आणि समाजासाठी प्रेरणादायी आहे. शिक्षण, ज्ञान आणि सामाजिक प्रबोधनाचा त्यांनी दिलेला संदेश प्रत्येक पिढीपर्यंत पोहोचविणे हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल.असे प्रतिपादन प्रोफेसर नवेद बिजापुरे यांनी केले.




मखदूम एज्युकेशन अँड वेल्फेअर सोसायटीच्या वतीने आलमगीर येथील मातोश्री उर्दू हायस्कूल येथे आधुनिक शिक्षणाचे पुरस्कर्ते, महान विचारवंत आणि समाजसुधारक सर सय्यद अहमद खान यांच्या जयंतीनिमित्त त्यांचे स्मरण करून त्यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून प्रोफेसर नवेद बिजापुरे उपस्थित होते. यावेळी मुख्याध्यापक जमीर अहमद शेख, शेख एजाज, शेखमेहनाज,शेख अंजुम, तंबोली नसरीन, सय्यद आफरीन उपस्थित होते.




पुढे बोलताना बिजापूरे म्हणाले की सर सय्यद अहमद खान यांनी शिक्षणाच्या माध्यमातून समाजाची प्रगती साधता येते, हा विचार त्यांनी समाजासमोर मांडला. विशेषतः मुस्लिम समाजात आधुनिक शिक्षणाचा प्रसार व्हावा, यासाठी त्यांनी आयुष्यभर प्रयत्न केले. 




त्यांनी शिक्षण, विज्ञान, सामाजिक सुधारणा आणि वैचारिक प्रगती यांना महत्त्व दिले. सन १८७५ मध्ये त्यांनी अलीगड येथे मोहम्मेडन अँग्लो-ओरिएंटल कॉलेजची स्थापना केली. याच संस्थेचे पुढे अलीगड मुस्लिम विद्यापीठात रूपांतर झाले. त्यांच्या कार्यामुळे आधुनिक शिक्षणाच्या क्षेत्रात नवी दिशा निर्माण झाली.




कार्यक्रमाचे सूत्रसंचालन खान निशात अंजुम यांनी केले.आभार जमीर शेख यांनी मानले.