नेप्ती गाव शिवारात हातभट्टीच्या अड्ड्यांवर नगर तालुका पोलिसांची छापेमारी
अहमदनगर : नगर तालुक्यातील अवैध धंद्यांवर पोलिसांनी कारवाईची मोहीम सुरु केली असून नेप्ती गावचे शिवारात असलेल्या गावठी हातभट्टीच्या अड्ड्यांवर नगर तालुका पोलिसांच्या पथकाने शनिवारी (दि. ६) दुपारी छापेमारी करत ९३ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करून त्याचा नाश केला आहे.नेप्ती शिवारात अनेक हातभट्ट्या आहेत. या ठिकाणी पोलिसांनी कारवाई केल्यावर काही दिवसातच पुन्हा हातभट्ट्या सुरु होतात, त्यामुळे नगर तालुका पोलिसांचा या भागाकडे कायम वॉच असतो. या भागात ३ ठिकाणी पुन्हा हातभट्ट्या सुरु झाल्याची माहिती सहाय्यक पोलिस निरीक्षक शिशिरकुमार देशमुख यांना मिळाली होती. त्यांनी पोलिस पथकाला कारवाईचे आदेश दिले.
त्यानुसार पथकाने छापेमारी करत या कारवाई दरम्यान तीन गावठी हातभट्टीचे अड्डे उध्वस्त करण्यात आले असून कारवाई मध्ये ८८ हजार रुपये किमतीचे ११०० लिटर गावठी हातभट्टी चे कच्चे रसायन व ५ हजार रुपये किमतीची ५० लिटर गावठी हातभट्टीची तयार दारू असा एकूण ९३ हजारांचा मुद्देमाल जागीच नाश करण्यात आला व सदर रसायनाची प्लॅस्टिक टिपाड व बॅरल व ड्रम जागीच नाश करण्यात आले.या प्रकरणी महेश अनिल पवार, विशाल मनोहर पवार, दिलीप नाथू पवार (सर्व रा. नेप्ती, ता. नगर) या तिघांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे ग्रामीणचे उपविभागीय पोलीस अधिकारी अजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली नगर तालुका पोलिस ठाण्याचे स.पो.नि. शिशिर कुमार देशमुख, पोलीस उपनिरीक्षक रणजीत मारग, पोलीस अंमलदार विक्रांत भालसिंग, कमलेश पाथरुट, जयदत्त बांगर, चालक विकास शिंदे, महिला पोलीस नाईक फुंदे यांच्या पथकाने केली.

0 टिप्पण्या
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com