विनर कंपनीच्या चुकीच्या पेपर तपासणी पद्धतीविरोधात आवाज
नगर - महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद ही शासनाची अधिकृत स्वायत्त संस्था असून परिषदेमार्फत राज्यातील जीसीसी-टीबीसी कॉम्प्युटर टायपिंग व शॉर्टहँडच्या परीक्षा घेतल्या जातात. तथापि, या परीक्षा परिषदेने बाहेरील खासगी कंपनीला परीक्षेचे काम सोपवले असून, त्या कंपनीकडून मनमानी व अपारदर्शक धोरणे राबवली जात असल्याचे गंभीर आरोप उघड झाले आहेत.
नगर जिल्ह्यातील संस्थाचालकांनी केलेल्या तक्रारींनुसार अनेक जीसीसी टीबीसी परीक्षा केंद्रांवर वीज, इंटरनेट, संगणक व प्रशिक्षित शिक्षकांचा अभाव असूनही परीक्षा घेतल्या जात आहेत. या बाबत तक्रार केली असता उपस्थित अधिकारी संगणकीय ज्ञानाअभावी कोणतेही प्रभावी उपाय करू शकत नाहीत.
विद्यार्थ्यांची उत्तरपत्रिकेची छायांकित प्रत मागविण्यासाठी व पुर्नमुल्यांकनासाठी मोठी फी आकारली जाते, मात्र मिळालेली उत्तरपत्रिका खरंच त्या विद्यार्थ्याचीच आहे याची कोणतीही खात्री नसते. परीक्षा परिषदेकडे अशा उत्तरपत्रिका पडताळणीसाठी कोणतेही ठोस पुरावे वा नियम उपलब्ध नाहीत. यासाठी परीक्षेचे वेळीच गती उता-याची प्रश्नपत्रिका व विद्यार्थ्याने टाईप केलेल्या गती उता-याची प्रत प्रिंट काढुन दयावी.
उत्तरपत्रिका पुनर्मूल्यांकन किंवा पुनर्परीक्षण प्रक्रियेसाठी कोणताही स्पष्ट नियम नाही. त्यामुळे अनेक मेहनती व चांगले सराव असणारे विद्यार्थी नापास तर काही कमी सराव असलेले विद्यार्थी मोठ्या गुणांनी उत्तीर्ण होत असल्याचे प्रकार घडत आहेत. प्रमाणपत्राची गुणवत्ता एकसारखी राहावी आणि ती डुप्लिकेट होऊ नये यासाठी अद्वितीय क्रमांक असलेले व छेडछाड न करता येणारे प्रमाणपत्र परीक्षा परिषदेकडूनच दिली जात नाही.
या अन्यायकारक प्रकारांविरोधात नगर जिल्ह्यातील सर्व संस्थाचालक व शेकडो विद्यार्थी यांनी सोमवार दिनांक २६/८/२०२५ रोजी दुपारी २.०० वाजता पुणे येथील परीक्षा परिषद कार्यालयात धडक देऊन निवेदन सादर केले. मात्र अध्यक्ष पालकर यांनी केवळ विचार करून पुढील कार्यवाही करू असे आश्वासन दिले; परंतु कोणताही ठोस निर्णय घेतला नाही.
संस्थाचालकांच्या मते परीक्षा परिषद विद्यार्थ्यांच्या व संस्थांच्या समस्या सोडविण्याऐवजी संबंधित कंपनीला पाठीशी घालत आहे. हे थेट विद्यार्थ्यांच्या भविष्यासोबत खेळ करणारे धोरण असून यामुळे तरुणांचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक व शैक्षणिक नुकसान होत आहे.
विद्यार्थ्यांना न्याय मिळाला नाही तर न्यायालयीन लढा उभारला जाईल. तसेच जीसीसी-टीबीसी कोर्स वाचवण्यासाठी जिल्ह्यातील सर्व विद्यार्थी एकत्र येऊन तीव्र आंदोलन छेडतील, असा इशारा यावेळी देण्यात आला. या सभेस अॅड. स्वाती जाधव, श्रीमती शिला गवळी, रेखा चौरे, शीतल पवार, अॅड. विठ्ठल बडे, गिरमकर सर, अभिजीत भुतकर, जालिंदर चौरे, मनोहर काळे, अतुल ढवळे, दीपक घेवारी, प्रदीप नालकुल, संतोष गायकवाड, सुनिल चव्हाण, आकाश नगरे, आदी संस्थाचालक तसेच मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com