नातू विराज ने साकारलेल्या मातीच्या गणपतीने पाचवी पिढी कला साधनेत दाखल : आनंद व्यक्त
नगर : दर्शक ।
ठिकठिकाणी इको फ्रेंडली गणपतीच्या कार्यशाळांचे आयोजन झाल्याने 33 वर्षांपूर्वी आपण जी चळवळ सुरू केली ती फळाला आल्याचा आनंद जगविख्यात चित्रशिल्पकार प्रमोद कांबळे यांनी व्यक्त केला.
आपल्या घराण्याच्या परंपरेनुसार दरवर्षी गणेशोत्सवात स्वतःच्या हाताने तयार गणपती पूजतात.
यावर्षी देखील त्यांनी घरच्या गणपतीची मूर्ती साकारली. त्या अगोदर पुणे येथे त्यांचा नातू विराज शुभंकर कांबळे याने श्री गणेशाची छोटीशी मूर्ती साकारली. ती पाहून आनंद व्यक्त करत कांबळे घराण्याची पाचवी पिढी कला साधनेत येत असल्याचे त्यांनी म्हटले.
ही मूर्ती कलेची परंपरा लोकाभिमुख व्हावी आणि त्यामधून युवा मूर्तिकार घडावेत. प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती तयार करण्यात काहीच कला नाही. ते यांत्रिकी काम आहे. त्या मूर्ती साकारताना कोणतेच कसब वापरले जात नाही.
पर्यावरणाला हानिकारक असणाऱ्या कोट्यावधीच्या संख्येने दरवर्षी तयार होणाऱ्या प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेश मूर्ती ऐवजी इको फ्रेंडली गणपतीची चळवळ उभी रहावी. घराघरात हाताने बनवलेले मातीचे गणपती तयार करून त्याचे दहा दिवस पूजन व्हावे आणि घरातल्या बादलीतच या गणपतीचे विसर्जन व्हावे असे आपण 33 वर्षांपूर्वी ठरवले होते.
प्लास्टर ऑफ पॅरिस च्या मुर्तींचे विसर्जन सार्वजनिक ठिकाणी केले जाते खरे पण ही मूर्ती पाण्यात लगेच विरघळत नाही. वरील रंग देखील हळूहळू बाजूला होतात. त्यासाठी काही महिन्यांचा कालावधी लागतो. आणि गाळून उपसताना या मूर्ती भंगलेल्या विदीर्ण अवस्थेत सापडतात. म्हणजे श्रीं च्या मूर्तीचे शास्त्रोक्त विसर्जन होत नाही. ही बाब आपल्याला नेहमी खटकत होती.
आपली कला जगताची जडणघडण नगर शहरातील ठिकठिकाणी असलेल्या गणेश निर्मिती कारखान्यातील कला पाहून झाली. शारदा मंदिर शाळेसमोर साताळकर यांचा गणपतीचा कारखाना होता. शाळा सुटल्यानंतर तासनतास आपण ते गणपती तयार करण्याचे न्याहळत असू. शिल्पकार साताळकर यांच्या हातची कला खूप जबरदस्त होते. राज्यातील कानाकोपऱ्यातून साताळकर यांचे कलात्मक गणपती घेण्यासाठी लोक त्या वेळेला येत. त्या काळी नगर मध्ये येवलेकर, वडझीरकर, दगडे, राजापुरे आदी मातीच्या मूर्ती कलाकुसरीने घडवणारे कलाकार होते. त्यांची प्रत्येक गणेश मूर्ती ही स्वतंत्र कलाकृतीचे मूल्य घेऊन साकारलेली असायची.
आपण दरवर्षी दोन मुर्त्या स्वतःच्या हाताने तयार करतो. त्यापैकी एक डॉ. साताळकर यांच्याकडे पूजेसाठी जाते. डॉ. साताळकर यांचे घराणे गणेश मूर्ती निर्मिती करत होते.
पूर्वी चितळे रोड, बागडपट्टी, आदी भागात मूर्तीकारांचे कारखाने होते. पुढे भविष्यात या रबर मोल्डचा शोध लागल्यानंतर प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मुर्त्या तयार करणारे शेकडो कारखाने उदयास आले. राज्यात आणि देशात आपण नगरकर गणपती पुरवत असू.पण प्लास्टर ऑफ पॅरिस हे प्रकृतीला हानिकारक आहे. ही मूर्ती रंगवण्यासाठी लागणारे रंग आणि वोर्णीश आरोग्यासाठी घातक आहे. आपल्या उमेदीच्या काळात एक छोटा गणपती माशांच्या एक्वेरियम मध्ये फक्त दोन मासे ठेवून त्यात विसर्जन केले. दुसऱ्या दिवशी लक्षात आले की हे दोन्ही मासे या गणपतीच्या रंगामुळे मृत झाले.
त्यामुळे आपण ही चळवळ सुरू करावी असे ठरवले. रावसाहेब पटवर्धन येथे देशातील पहिली गणपती बनवा कार्यशाळा घेतली. त्यावेळी तेहतीस मुलांनी नोंदणी केली. आपलाही तो उमदीचा काळ होता. मुलांना गणपती कसा बनवायचा हे समजून सांगण्याचा खूप प्रयत्न केला त्याला यश आले नाही. त्या 33 मुलांचे गणपती पूर्ण करून देण्यात आपले तीन ते चार दिवस खर्च झाले. पण त्यातून खूप काही शिकलो.
एका आयताकृती ओल्या मातीची विट घेऊन अत्यंत सोप्या पद्धतीने गणपती कसा करायचा हे शोधून काढले आणि मग दरवर्षी शेकडो कार्यशाळा आपण घेतल्या. राज्याच्या सर्वच शहरात, छोट्या गावात , राज्याबाहेर देखील विविध मोठ्या शहरात आपल्या या कार्यशाळा घेऊन हा संकल्प सिद्धीस नेला. त्यामुळे इको फ्रेंडली गणपतीची मोठी चळवळ उभी राहिली. राज्य सरकारने देखील मनावर घेतले.
प्लास्टर ऑफ पॅरिसवर बंदी आणली.
लोकांमध्ये पर्यावरणाबद्दल जनजागृती केली. गणपती विसर्जन हे सार्वजनिक ठिकाणी न करता कृत्रिम पद्धतीने साठवलेल्या पाण्यात करण्याची मोहीम सुरू झाली. आता तर आपल्या व्यतिरिक्त हजारो कलाकार, कला शिक्षक व कलाप्रेमी या प्रकारच्या गणपती बनवायच्या कार्यशाळा घेऊन मुलांचे प्रबोधन करत आहेत आणि ही चळवळ मोठी होत आहे यात आपल्याला आनंद आहे असे ते म्हणाले.या उपक्रमाचा उद्देश साध्य झाल्याचं समाधान त्यांनी यावेळी व्यक्त केलं.
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com