Nagar Congress | महानगरपालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन शहरातील लोकप्रतिनिधीकडून ‘सामाजिक शांतता’ बिघडवण्याचा प्रयत्न : दीप चव्हाण
Nagar Congress | नगर – प्रशासनाला हाताशी धरून दर्गा, समाजमंदिरे उद्ध्वस्त करणे, मोर्चे काढून, रास्ता रोको करून कायदेशीर मार्गांचे पालन न करता सामाजिक शांतता बिघडवण्याचा होत असलेला प्रयत्न हा फक्त आणि फक्त आगामी महापालिकेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन लोकप्रतिनिधीकडून होत असल्याचा आरोप काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष दीप चव्हाण यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केला आहे.
त्यात म्हटले आहे की, एक काळ होता, शिवसेना नेते, माजी मंत्री दिवंगत आमदार अनिल राठोड यांची ‘हिंदू धर्मरक्षक’ म्हणून प्रतिमा अभिमानाने मिरवली गेली. पण त्यामागची कारणे वस्तुनिष्ठ होती. त्यांनी आपली प्रतिमा जपतांना हिंदू, मुस्लिम समाजात किंवा इतर समाजात जातीय तेढ निर्माण करून रक्तपात होईल, माथेफिरू रस्त्यावर उतरून सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करतील, असे प्रकार कधीच होऊ दिले नाही.
‘भयमुक्त नगर’ हा त्यांचा नारा होता आणि तो त्यांनी खरा करून दाखवला होता. ५ टर्म ते आमदार राहिले, शिवसेनेचे नेतृत्व केले. पण जातीय, हिंसक दंगली घडल्या तर त्यांनी त्यावेळी शांतता प्रस्थापित करण्याचाच प्रयत्न केला. साम,दाम, दंड भेदाचा वापर केला आणि योग्य निर्णय घेऊन शांतता निर्माण केली. कधीही कायदा व सुव्यस्था बिघडू दिली नाही.
बाहेरच्या लोकप्रतिनिधींकडून नगरमध्ये प्रक्षोभक वाक्ये टाकून शांतता बिघडवण्याच्या प्रकार
आज लोकप्रतिनिधीकडून होणारे प्रकार युवकांची माथी भडकावत आहे. बाहेरच्या लोकप्रतिनिधींकडून नगरमध्ये प्रक्षोभक वाक्ये टाकून शांतता बिघडवण्याच्या प्रकार अनिल राठोड यांनी घडवून आणला नाही. प्रत्येक घटना परिस्थिती हाताळण्यासाठी राठोड हे एकटेच समर्थ होते. त्यांना दुसर्या कोणाची गरज भासली नाही. नगर शहर एक तर शाश्वत विकासापासून कोसो दूर आहे. निवडणुकीच्या तोंडावर १५० कोटी रुपयांच्या रस्त्याची कामे काढली. ती सर्व अर्धवट आहेत. १५० कोटीच्या बदल्यात मनपाकडे स्वनिधी भरण्यासाठी निधी शिल्लक नाही. आयुक्तांना ते पैसे उभे करण्यासाठी ठेकेदाराकडेच हात पसरावे लागतात.
भर बाजारपेठेतील रस्ते सणासुदीच्या तोंडावर खोदून ठेवलेले
भर बाजारपेठेतील रस्ते सणासुदीच्या तोंडावर खोदून ठेवलेले आहेत. त्यातून वाहनचालक वाट काढू शकत नाहीत. स्थानिक व्यावसायिक आणि व्यापार्यांनाआपले व्यवसाय बंद करण्याची वेळ आली आहे. प्रत्यक्षात ५० कोटी रुपये निधीमध्ये सर्वच रस्त्यांची कामे सुरु करण्यात आली. आता अजून १०० कोटी रुपये येणे बाकी आहे. त्याला पुढची पंचवार्षिक उजाडेल, असे दिसत आहे. पण कोणालाच काही देणे घेणे नाही.
नगरच्या जनतेला केवेळ मुर्खात काढण्यात ते यशस्वी
नगरच्या जनतेला केवेळ मुर्खात काढण्यात ते यशस्वी झाले. पण जनता देखील काहीच बोलत नाही. फक्त सर्जेपुरा रस्त्यावर वाहतुकीची कोंडी झाली की सर्वच रस्त्यावर वाहतूक थांबते आणि जनजीवन ठप्प होते. ही समस्याच बनली आहे. अशा स्थितीत ऐन सणा सुदीत रविवारच्या सुटीच्या दिवशी मोर्चे काढून बाजारपेठ बंद ठेवायला लावल्याने नगरची बाजारपेठ उद्ध्वस्तकरण्याचा हा डाव तर नाही ना.
या सणाच्या निमित्ताने विशिष्ट जाती, धर्माच्या लोकांकडून व्यवहार करा, अशी सक्ती जरी केली तरी ते प्रत्यक्षात अशक्य आहे. आज प्रत्येक व्यवसायात सर्वधर्मीय बांधव आहेत. एकमेकांशी त्यांचे व्यावसायिक संबंध आहेत. तरीदेखील अशा प्रकारची सक्ती करणे हे केवळ आणि केवळ निवडणुकांसाठी मतांचे ध्रुवीकरण करण्यासाठी दिलेला हा नारा आहे. त्यामुळे प्रशासनाने योग्य अशी दखल घेऊन कायदा हातात घेऊन ज्या व्यक्ती काम करीत असतील तर त्यांना वेळीच आळा घालावा, अशी मागणी दीप चव्हाण यांनी पत्रकाद्वारे केली आहे.
या शहरात शांतता, भाईचारा कायम रहावा. येणारे सण उत्सव हर्षोल्लासात, सौहार्दपूर्ण वातावरणात साजरा व्हावा. भारतीय राज्य घटनेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी समता, एकता, बंधुता आणि धर्मनिरपेक्षता या संदेशाचे पालन करूनच सर्वांनी सणांचा आनंद घ्यावा आणि पोलिसांनाही या आनंदात सहभागी करून घेण्यासाठी त्यांचे काम वाढू नये, याची दक्षता सर्वांनी घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले आहे
0 टिप्पण्या
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com