श्रद्धा आणि सेवा या आधारस्तंभांवर साई संघर्ष सामाजिक प्रतिष्ठानचे कार्य प्रेरणादायी - आयुक्त यशवंत डांगे
नगर – वसंत टेकडी येथील संदेश नगर मधील साई संघर्ष सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने दर महिन्याच्या अखेरच्या गुरुवारी आयोजित करण्यात येणारी ‘साईनाथ भजन संध्या’ मोठ्या श्रद्धा आणि उत्साहात संपन्न झाली. या कार्यक्रमात भाविकांनी साईनामाचा अखंड जयघोष करीत भजनांच्या माध्यमातून भक्तीभावाने साईनाथांप्रती आपली निष्ठा व्यक्त केली.
कार्यक्रमाचा समारोप महाआरतीने करण्यात आला. ही महाआरती अहिल्यानगर महानगरपालिकेचे आयुक्त यशवंत डांगे यांच्या हस्ते पार पडली. यावेळी नगरसेवक सुनील नारायण त्र्यंबके, बाळासाहेब पवार, शंतनु वाने, विकी करोलिया, शहाणे काका, संदीप कोरोलिया, आणि निखिल त्र्यंबके यांच्या सह अनेक मान्यवर उपस्थित होते.
आपल्या भाषणात आयुक्त मा. यशवंत डांगे म्हणाले की, “साई संघर्ष सामाजिक प्रतिष्ठानने समाजात धार्मिकतेबरोबरच सामाजिक कार्याचा सुंदर संगम साधला आहे. श्रद्धा आणि सेवा या दोन आधारस्तंभांवर उभी राहिलेली ही संस्था अहिल्यानगरातील नागरिकांसाठी प्रेरणादायी आहे. विशेष म्हणजे नगरसेवक सुनील त्र्यंबके यांनी साई सेवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून नागरिकांना मदतीचा हात देत, धार्मिक आणि सामाजिक कार्यात नेहमीच पुढाकार घेतला आहे. त्यांच्या या उपक्रमामुळे समाजात एकात्मतेचा आणि सद्भावनेचा संदेश पसरत आहे.”
तसेच त्यांनी पुढे असेही सांगितले की, “महानगरपालिकेच्या माध्यमातून आम्ही अशा समाजोपयोगी संस्थांना नेहमीच सहकार्य करू. साईनाथांच्या कृपेने शहरात सकारात्मकता, भक्ती आणि सेवाभाव वाढावा, हीच आपली अपेक्षा आहे.”
कार्यक्रमात नगरसेवक सुनील त्र्यंबके यांनी सुद्धा आपले विचार मांडले. ते म्हणाले, “साईनाथ भजन संध्या हा केवळ धार्मिक कार्यक्रम नसून, तो समाजातील ऐक्य आणि भक्तीचा उत्सव आहे. साई संघर्ष सामाजिक प्रतिष्ठानच्या माध्यमातून आम्ही नेहमीच दुर्बल घटकांना सहाय्य करण्याचा आणि समाजात चांगुलपणाचा प्रसार करण्याचा प्रयत्न केला आहे. नागरिकांनी साईनाथांच्या उपदेशाप्रमाणे ‘श्रद्धा आणि सबुरी’ या दोन मूल्यांचा अंगीकार करून समाजकार्यात सहभागी व्हावे, हीच आमची अपेक्षा आहे.”
या कार्यक्रमात उपस्थित सर्व भक्तांना प्रसाद वितरण करण्यात आले. वातावरणात साईनामाचे गजर, ताल-मृदंगाचा नाद आणि भक्तीचा ओलावा सर्वत्र दरवळत होता. श्रद्धा, भक्ती आणि सेवेचा मिलाफ असलेल्या या ‘साईनाथ भजन संध्येला’ उपस्थित मान्यवरांनी आणि नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

0 टिप्पण्या
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com