नवी पेठ येथील श्रीराम मंदिरात देव दिवाळी आणि त्रिपुरा पौर्णिमा निमित्त दीपोत्सव
नगर – नवी पेठ येथील श्रीराम मंदिरात देव दिवाळी आणि त्रिपुरा पौर्णिमेनिमित्त दिव्य आणि भक्तिमय वातावरणात दीपोत्सव साजरा करण्यात आला. श्रीराम भक्त हनुमान सत्संग मंडळ ट्रस्टच्या वतीने आयोजित या दीपोत्सवाने मंदिर परिसर प्रकाशमय झाला होता. भक्तांच्या सहवासात आणि “जय श्रीराम” च्या घोषात संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता. या दीपोत्सवाचे वैशिष्ट्य म्हणजे संपूर्ण मंदिर परिसरात सुंदर लखलखीत भव्य दिव्य दिव्यांनी प्रज्वलित करण्यात आले होते. विविध रंग, आकार आणि कलात्मकतेतून सजवलेले हे दिवे पाहण्यासाठी नागरिकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली.
या दीपोत्सवात श्रीकृष्ण लीलेची झलक देखील साकारण्यात आली होती. गोवर्धन पर्वत उचलणाऱ्या श्रीकृष्णाची लीला ही या सजावटीचा मुख्य आकर्षण ठरली. श्रीराम मंदिराच्या सभोवती फुलांची नाजूक आणि देखणी सजावट करण्यात आली होती. मंदिराच्या गाभाऱ्यापासून प्रवेशद्वारापर्यंत दिव्यांची साखळी आणि विद्युत रोषणाईने मंदिर उजळून निघाले होते. या दृश्याने उपस्थित भाविक मंत्रमुग्ध झाले.
दीपोत्सवाच्या कार्यक्रमाला अहिल्यानगर आणि परिसरातील शेकडो भाविकांनी उपस्थित राहून दर्शन घेतले. संध्याकाळी आरती, नामस्मरण आणि सामूहिक दीपप्रज्वलनाने भक्तीमय वातावरण निर्माण झाले होते. अनेकांनी आपल्या कुटुंबासह उपस्थित राहून या दिव्य सोहळ्याचा आनंद लुटला. भाविकांनी समाधान व्यक्त करत दरवर्षी अशा प्रकारचे आयोजन व्हावे अशी इच्छा व्यक्त केली.
श्रीराम भक्त हनुमान सत्संग मंडळ ट्रस्टचे सर्व सेवेकरींनी गेल्या काही दिवसांपासून या दीपोत्सवाची तयारी केली होती. त्यांच्या परिश्रमामुळे मंदिर परिसरात उत्साह आणि भक्तीचा संगम घडला. या मंडळाच्या वतीने वर्षभर विविध धार्मिक आणि सामाजिक उपक्रम राबवले जातात.
श्रीराम जन्मोत्सव, हनुमान जन्मोत्सव गोकुळ अष्टमी अयोध्या श्रीराम मंदिर वर्ष पूर्ती सोहळा, तसेच दर शनिवारी हनुमान चालीसा पठण व महाप्रसाद केला जातो अशी माहिती ट्रस्टचे अध्यक्ष श्री प्रितम जी मुथ्था व उपाध्यक्ष श्री निखिलजी शेटीया यांनी दिली तसेच सर्व धार्मिक कार्यक्रमांबरोबरच सामाजिक कार्यातही मंडळ ट्रस्ट सक्रिय आहे.

0 टिप्पण्या
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com