‘वंदे मातरम्’ गीताला १५० वर्षे पूर्ण झाल्याच्या औचित्याने अहमदनगर महाविद्यालयात सामूहिक गायनाचा भव्य कार्यक्रम
नगर : दर्शक |
भारताच्या राष्ट्रीय जागृतीचे प्रतीक ठरलेल्या ‘वंदे मातरम्’ गीताला १५० वर्षे पूर्ण झाल्याच्या औचित्याने अहमदनगर महाविद्यालय, अहिल्यानगर येथे सामूहिक गायनाचा भव्य कार्यक्रम उत्साहात पार पडला. विद्यार्थी विकास मंडळ, आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र, राष्ट्रीय सेवा योजना (NSS) आणि राष्ट्रीय छात्र सेना (NCC) यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
राष्ट्रीय एकात्मतेचा प्रसार आणि सकारात्मक सामाजिक संदेश देण्याचे उद्दिष्ट या कार्यक्रमामागे ठेवण्यात आले होते. ‘वंदे मातरम्’ या दोन शब्दांत भारतीय मातृभूमीबद्दलचे अपार प्रेम, निष्ठा आणि अभिमान दडलेला आहे. या गीताचे रचनाकार बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांनी आपल्या ‘आनंदमठ’ या कादंबरीतून हे गीत राष्ट्रभावनेचा स्वर देत प्रकाशित केले होते. ब्रिटिश सत्तेविरुद्धच्या स्वातंत्र्यलढ्यात ‘वंदे मातरम्’ हे गीत एक प्रेरणादायी घोष बनले होते. या गीताने असंख्य तरुणांच्या मनात स्वातंत्र्याची ज्योत प्रज्वलित केली, म्हणूनच ते आजही राष्ट्रीय अभिमानाचे प्रतीक ठरते.
या सामूहिक गायन कार्यक्रमाचे आयोजन भा. पां. हिवाळे संस्थेचे अध्यक्ष डॉ. आर. जे. बार्नबस आणि सचिव विशाल बार्नबस यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रस्ताविक आणि सूत्रसंचालन विद्यार्थी विकास अधिकारी डॉ. भागवत परकाळ यांनी प्रभावीपणे केले, तर आभार प्रदर्शन राष्ट्रीय सेवा योजना समन्वयक डॉ. रविकिरण लाटे यांनी मानले.
या प्रसंगी महाविद्यालयाचे उपप्राचार्य दिलीपकुमार भालसिंग, कायम विनाअनुदानित विभागाचे समन्वयक डॉ. सय्यद रज्जाक, रजिस्ट्रार श्रीमती कल्पलता भिंगारदिवे, कनिष्ठ विभागाचे उपप्राचार्य प्रा. प्रतुल कसोटे, तसेच राष्ट्रीय छात्र सेनेचे समन्वयक डॉ. माधव जाधव उपस्थित होते.
कार्यक्रमास महाविद्यालयातील सर्व विभागांचे प्रमुख, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी विद्यार्थी विकास मंडळ, राष्ट्रीय सेवा योजना आणि राष्ट्रीय छात्र सेनेच्या स्वयंसेवकांनी विशेष परिश्रम घेतले.
देशभक्तीचा ओलावा आणि राष्ट्रीय अभिमानाने भारलेले ‘वंदे मातरम्’चे स्वर महाविद्यालयाच्या प्रांगणात गुंजले आणि विद्यार्थ्यांमध्ये एकात्मतेचा संदेश पोहोचवला.

0 टिप्पण्या
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com