शिवसेना नेते खा. संजय राऊतांना शहरप्रमुख किरण काळेंचे भावनिक पत्र
नगर : दर्शक ।
शिवसेनेचे फायर ब्रँड नेते खा. संजय राऊत यांनी प्रकृती अस्वस्थतेमुळे पुढील दोन महिने सार्वजनिक जीवनात सक्रिय राहणार नसल्याचे समाज माध्यमांमधून जाहीर केले. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी, विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यासह देशभरातील अनेक महत्त्वाच्या नेत्यांनी त्यांच्या प्रकृतीसाठी सदिच्छा व्यक्त केल्या. शिवसैनिकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. राऊत यांना ठाकरे शिवसेनेचे शहर प्रमुख किरण काळे यांनी एक भावनिक पत्र लिहिले असून या माध्यमातून आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली आहे.
पत्रात काळे यांनी म्हटले आहे, महाराष्ट्राच्या राजकारणात मागील तीन-चार वर्षांमध्ये प्रचंड मोठी उलथा पालथ झाली. पक्षच्या पक्ष चोरले गेले. मत चोरी झाली. संविधान धाब्यावर बसवले गेले. पदोपदी लोकशाही पायदळी तुडवली जात आहे. हिटलरशाही अवतरी आहे. आशा परिस्थितीत आपण केवळ शिवसेनाच नव्हे तर महाराष्ट्रासह देशातील सर्वच विरोधी पक्षांचा बुलंद आवाज बनलात. विरोधकांना पळता भुई थोडी केली. २०२० मध्ये आपल्यावर हृदय शस्त्रक्रिया झाली. तथाकथित पत्रा चाळ गैरव्यवहाराच्या नावाखाली तुम्हाला नाहक गोवण्यात आलं. ईडीने अटक केली. १०० दिवस तुरुंगात डांबलं. शरण येण्यासाठी प्रचंड दबाव आणला गेला. पण हा संघर्ष योद्धा शरण गेला नाही.
काळे यांनी पुढे म्हटले आहे, २९ तारखेला सायंकाळी राऊत यांचा त्यांना फोन आला. त्याच बोलणं ही झालं. लवकरच भेटायचं ठरलं. आणि दोन दिवसांनी अचानक राऊत यांनी जारी केलेलं पत्रक समोर आलं. काळजीने माझ्या मनाची घालमेल झाली. सबंध देशाने काळजी व्यक्त केली. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यासह सर्वच पक्षांच्या नेत्यांनी प्रकृती सुधारण्यासाठी सदिच्छा व्यक्त केल्या. जगातील सर्वात मोठी लोकशाही असणाऱ्या भारतीय राजकीय व्यवस्थेतील संजय राऊत या व्यक्तीच काय महत्त्व आहे हे यातून अधोरेखित झालं.
हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या मुशीत घडलेले आपण हाडाचे पत्रकार आहात. संकट काळातही आपले नेते सन्माननीय उद्धव ठाकरे साहेब यांची साथ न सोडणारे लढवय्ये, सच्चे मित्र आहात. माझ्यासारख्या फिल्डवर लढणाऱ्या अनेक शिवसैनिकांचा गुरु, आधारवड आहात. सध्या जरी आजाराने आपल्याला गाठले असले तरी त्या आजाराच्याही छाताडावर नाचण्याची ताकद आणि दुर्दम्य इच्छाशक्ती असणारे आपण जिद्दी, कडवट शिवसैनिक आहात.
तुम्ही लढाल आणि जिंकाल ही :
काळे यांनी पत्रात शेवटी म्हटले आहे, मला कल्पना आहे, या विश्रांतीच्या ही काळात तुम्ही स्वस्थ बसणार नाहीत. तो तुमचा स्थायीभाव नाही. तुमची लेखणी सुरूच राहील. पण डॉक्टरांचा सल्ला ऐकाच. विश्रांती घ्या. आरोग्याकडे अजिबात दुर्लक्ष करू नका. लवकर बरे व्हा. संबंध देश तुमची वाट पाहतो आहे.
आम्हा तमाम शिवसैनिकांना पूर्ण विश्वास आहे की, नव्या वर्षात, नव्या जोमाने, नव्या ताकतीने तुम्ही पुन्हा मैदानात उतराल. तुमच्या निधड्या छातीचा कोट करून, त्याच निर्भीडतेने, मुलुख मैदानी तोफ घेऊन संविधानाच्या रक्षणासाठी उतराल.. लढाल... आणि जिंकाल ही.

0 टिप्पण्या
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com