युनायटेड सिटी फाऊंडेशनच्या वतीने अल्पसंख्याक हक्क दिवसानिमित्त व्याख्यान संपन्न
नगर - अल्पसंख्यांक हक्क दिन हा केवळ एका समुदायाचा नव्हे, तर भारताच्या लोकशाही मूल्यांचा आणि घटनात्मक न्यायाचा उत्सव आहे. आपल्या देशाची ओळख विविधतेतून निर्माण झालेल्या एकतेमुळे आहे. धर्म, भाषा, संस्कृती, परंपरा यातील भिन्नता ही आपली कमजोरी नसून तीच आपली खरी ताकद आहे.
अल्पसंख्यांकांचे हक्क सुरक्षित ठेवणे म्हणजे देशाच्या लोकशाही पायाभूत मूल्यांचे संरक्षण करणे होय. जेव्हा समाजातील शेवटच्या घटकापर्यंत न्याय, शिक्षण आणि विकास पोहोचतो, तेव्हाच राष्ट्र प्रगतीच्या मार्गावर खऱ्या अर्थाने पुढे जाते.असे प्रतिपादन युनायटेड सिटी फाऊंडेशनचे संस्थापक डॉ इमरान शेख यांनी केले.
युनायटेड सिटी फाउंडेशनच्या वतीने अल्पसंख्यांक हक्क दिवसानिमित्त सर्जेपुरा येथील रहेमत सुलतान हॉली येथे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून माजी प्राचार्य नवेद बिजापुरे, रहमत सुलतान फाउंडेशनचे अध्यक्ष युनूसभाई तांबटकर, माजी प्राचार्य सिराज कुरेशी, उबेद शेख, अफजल सय्यद, वहाब सय्यद आदी मान्यवर उपस्थित होते.
पुढे बोलताना डॉ इमरान म्हणाले की, भारतीय संविधानाने प्रत्येक नागरिकाला समानतेचा, स्वातंत्र्याचा आणि सन्मानाने जगण्याचा हक्क दिला आहे. अल्पसंख्यांक समाजालाही शिक्षण, रोजगार, धार्मिक स्वातंत्र्य, सांस्कृतिक जतन आणि विकासाच्या समान संधी मिळाव्यात, यासाठी संविधानात विशेष तरतुदी करण्यात आल्या आहेत. या हक्कांचा उद्देश कुणाला विशेष लाभ देणे नसून समाजाच्या मुख्य प्रवाहात सर्वांना समान सहभागाची संधी देणे हा आहे.
आजही अनेक अल्पसंख्यांक घटक शिक्षण, आरोग्य, रोजगार आणि आर्थिक प्रगतीपासून वंचित आहेत. अशा परिस्थितीत शासनाच्या योजना, शैक्षणिक सवलती, कौशल्य विकास कार्यक्रम आणि स्वयंरोजगाराच्या संधी यांची प्रभावी अंमलबजावणी होणे अत्यंत आवश्यक आहे. त्याचबरोबर समाजातील प्रत्येक घटकाने परस्पर सन्मान, सहकार्य आणि सलोखा जपणेही तितकेच महत्त्वाचे आहे.
या अल्पसंख्यांक हक्क दिनानिमित्त आपण सर्वांनी संविधानाने दिलेल्या मूल्यांचा आदर करत, समानता, बंधुता आणि न्याय या तत्वांवर आधारित समाज घडवण्याचा संकल्प करूया. हाच या दिवसाचा खरा संदेश आहे.असे नमुद केले.
शिक्षण संस्थांमध्ये लायकी नसलेले लोक बसलेले असल्यामुळे अल्पसंख्याकांचे संस्था अधोगतीला लागले आहेत असे उबेद शेख यांनी सांगितले.तर अल्पसंख्याकांच्या खाजगी संस्थेच्या शाळेत शिक्षक भरती जिल्हा परिषदेने पवित्र पोर्टल ने केली पाहिजे असे युनूस तांबटकर म्हणाले.
समविचारी लोकांनी एकत्रित येऊन कृतीत कार्यक्रम घडविला पाहिजे. तरच समाजात बदल बघायला मिळेल असे वहाब सय्यद म्हणाले. अधिकार मागून नाही मिळतात त्याच्यासाठी भांडावे लागतात.जो पर्यंत शिक्षक सुधारत नाही तो पर्यंत विधार्थी सुधरणार नाही अशी खंत माजी प्राचार्य नवेद बिजापुरे यांनी व्यक्त केली.
कार्यक्रमास अल्पसंख्याक समाजातील अनेक मान्यवरांनी उपस्थिती दर्शविली.
सुत्रसंचालन सबील सय्यद यांनी केले.तर आभार रेहान सय्यद यांनी मानले.

0 टिप्पण्या
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com