Snehalay | अनाथांच्या पुनर्वसनासाठी समाजाने पुढाकार घेणे गरजेचे – मा. विनोद अरुणसिंग परदेशी

 Snehalay | अनाथांच्या पुनर्वसनासाठी समाजाने पुढाकार घेणे गरजेचे – मा. विनोद अरुणसिंग परदेशी  

Snehalay | अनाथांच्या पुनर्वसनासाठी समाजाने पुढाकार घेणे गरजेचे – मा. विनोद अरुणसिंग परदेशी



नगर : दर्शक । 

अनाथांच्या पुनर्वसनासाठी समाजाने पुढाकार घेणे गरजेचे आहे, याच भावनेतून स्नेहालय संस्थेमार्फत अनाथ व निराधार जोडप्यांचे सामुदायिक विवाह आयोजित करून सामाजिक विकासाला प्रेरणा देणारी क्रांतिकारक कृती करण्यात आली आहे, असे प्रतिपादन मा. विनोद अरुणसिंग परदेशी (पोलीस उपनिरीक्षक, एमआयडीसी, अहिल्यानगर) यांनी केले.


स्नेहालय संस्थेत आयोजित सामुदायिक विवाह सोहळ्याच्या प्रसंगी ते बोलत होते. यावेळी त्यांनी नवदाम्पत्यांना शुभाशीर्वाद देत योग्य आहार, उपचार व आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन केले. स्नेहालयने राबवलेल्या या अलौकिक व अनोख्या उपक्रमाबद्दल त्यांनी संस्थेचे विशेष आभार मानले.



या कार्यक्रमास अक्षय शिवाजी रोहेकले (पोलीस कॉन्स्टेबल, एमआयडीसी, अहिल्यानगर), शिवाजी जाधव (जिल्हा कार्यक्रम अधिकारी, जिल्हा एड्स प्रतिबंधक व नियंत्रण विभाग) यांची प्रमुख उपस्थिती होती. सर्व मान्यवरांनी नवविवाहित जोडप्यांना शुभाशीर्वाद दिले.



यावेळी स्नेहालयाच्या अध्यक्ष जयाताई जोगदंड, विश्वस्त डॉ अंशू मुळे , सपना असावा व शिल्पा कामत, संचालक हनिफ शेख, प्रविण मुत्याल, स्नेहाधार प्रकल्पाचे मानद संचालक अॅड. श्याम असावा, तसेच पुणे स्नेहाधारचे विनोदिनी सातभाई, प्रीती गोडबोले, लता मोहळ, विवेक नारळकर आदी मान्यवर आप्त म्हणून उपस्थित होते.



समाजाने वाळीत टाकलेल्या एच.आय.व्ही. संसर्गित व्यक्तींकरिता स्नेहालय संस्थेमार्फत “नवी उमेद – नवे जीवन – नवी आशा” या संकल्पनेतून २ डिसेंबर २०२५ रोजी सहजीवनाची ओढ असणाऱ्यांसाठी राज्यस्तरीय वधू-वर परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात ३०० पेक्षा अधिक वधू-वरांनी नोंदणी केली होती. त्यापैकी दोन जोडप्यांचा विवाह मोठ्या दिमाखात पार पडला.



या सामुदायिक विवाह सोहळ्यात वधूंचे आप्त म्हणून स्नेहालय परिवारासह इतर संवेदनशील नागरिकांनी मोलाची भूमिका बजावली. मा. मंगेश रामचंद्र शेठ व अरुणा मंगेश शेठ तसेच शिल्पा मिलिंद चंदगडकर व मिलिंद चंदगडकर यांच्या हस्ते कन्यादानाचा विधी पार पडला.



प्रास्ताविकात स्नेहालयाचे संचालक प्रविण मुत्याल यांनी सांगितले की, जागतिक एच.आय.व्ही./एड्स सप्ताहाच्या समारोपानिमित्त समाजातील नागरिकांनी एच.आय.व्ही./एड्सबाबत भीती न बाळगता अधिक सजग राहणे आवश्यक आहे. यावेळी त्यांनी १ ते १५ डिसेंबर २०२५ दरम्यान जागतिक एच.आय.व्ही./एड्स सप्ताहनिम्मित्त स्नेहालय, महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्था आणि जिल्हा एड्स प्रतिबंधक व नियंत्रण विभाग, मर्करी फीनिक्स ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने विविध उपक्रम आयोजित करण्यात आलेल्या विविध जनजागृती उपक्रमांची सविस्तर माहिती दिली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या