Top News

आर्मड स्टॅटिक वर्कशॉप ईएमई व बोल फाउंडेशन आयोजित विशेष रक्तदान शिबिर

 आर्मड स्टॅटिक वर्कशॉप ईएमई व बोल फाउंडेशन आयोजित विशेष रक्तदान शिबिर




नगर : दर्शक 
 थॅलेसेमिया हा रक्ताशी निगडित गंभीर व दुर्धर आजार निष्पाप बालकांमध्ये आढळून येतो. अशा आजारग्रस्त बालकांना जगण्यासाठी वारंवार रक्ताची गरज भासते. नियमित रक्तपुरवठा मिळाल्यास या बालकांचे जीवनमान सुधारण्यास व आयुष्य वाढविण्यास मोठी मदत होते. 


मात्र सध्या रक्ताचा पुरवठा अत्यंत कमी प्रमाणात असल्याने रक्तदान शिबिरांद्वारे रक्तदात्यांची नितांत गरज असल्याची माहिती जनकल्याण रक्त केंद्राच्या जनसंपर्क अधिकारी सोनाली खांडरे यांनी बोल फाउंडेशनशी संपर्क साधून दिली. यानंतर आर्मड स्टॅटिक वर्कशॉप ईएमई येथे विशेष रक्तदान शिबिर आयोजित करण्याबाबत चर्चा करण्यात आली.



श्याम पोळ व लेफ्टनंट कर्नल विमलचंद बुध यांच्या माध्यमातून आर्मड स्टॅटिक वर्कशॉप ईएमई, अहिल्यानगरचे कमांन्डडन्ट कर्नल मनराज सिंह यांच्याशी संपर्क साधण्यात आला. थॅलेसेमियाग्रस्त बालकांसाठी रक्ताची अत्यंत गरज असल्याची विनंती त्यांनी तात्काळ मान्य केली. त्यानुसार आर्मड स्टॅटिक वर्कशॉप अहिल्यानगर युनिटने बोल फाउंडेशनच्या पुढाकाराने व सहकार्याने विशेष तातडीचे रक्तदान शिबिर आयोजित केले. या शिबिरात भारतीय सैन्य दलातील एकूण ४३ जवानांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत रक्तदान केले.



या रक्तदान शिबिरामुळे थॅलेसेमिया या रक्ताशी संबंधित दुर्धर आजाराशी झुंज देणाऱ्या निष्पाप बालक रुग्णांना जीवन विस्तारित करण्यासाठी आवश्यक मदत मिळाली. विशेष म्हणजे एएसडब्ल्यू (आर्मड स्टॅटिक वर्कशॉप) अहिल्यानगर युनिटचे कमांन्डडन्ट कर्नल मनराज सिंह यांनी स्वतः सर्वप्रथम रक्तदान करून एक आदर्श निर्माण केला. यावेळी भारतीय सैन्य दलातील लेफ्टनंट कर्नल, मेजर, कॅप्टन, जेसीओ तसेच इतर विविध पदाधिकाऱ्यांनीही रक्तदान केले.


शिबिराच्या प्रारंभी बोल फाउंडेशनचे अध्यक्ष जोसेफ पाटोळे यांनी रक्तदानाचे महत्त्व विशद केले. कमांन्डडन्ट कर्नल मनराज सिंह व उपस्थित अधिकाऱ्यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून रक्तदान शिबिराचा प्रारंभ करण्यात आला. कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी बोल फाउंडेशनच्या सचिव शोभा पाटोळे यांनी कमांडन कर्नल मनराज सिंह व सर्व पदाधिकाऱ्यांचे आभार मानले तसेच बोल फाउंडेशनच्या वतीने सन्मानचिन्ह भेट देण्यात आले.


या रक्तदान शिबिरासाठी जनकल्याण रक्त केंद्राचे बहुमोल सहकार्य लाभले. डॉ. वसंतराव झेंडे, डॉ. विलासराव मढीकर, जनसंपर्क अधिकारी सोनाली खांडरे तसेच इतर कर्मचाऱ्यांनी शिबिर यशस्वी करण्यासाठी मोलाचे योगदान दिले. तसेच सुभेदार मेजर सौरभ सिंह चंद्रा यांनीही शिबिर यशस्वी होण्यासाठी विशेष सहकार्य केले.

Post a Comment

For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com

أحدث أقدم