Top News

जिल्हा हिवताप कार्यालय व प्रयत्ना नर्सिंग स्कूल येथे जागतिक हिवताप दिन उत्साहात साजरा

 “डास नियंत्रण, स्वच्छता आणि जनसहभागातून हिवतापमुक्त समाजाकडे वाटचाल”

जिल्हा हिवताप कार्यालय व प्रयत्ना नर्सिंग स्कूल येथे जागतिक हिवताप दिन उत्साहात साजरा









अहिल्यानगर : दरवर्षी २५ एप्रिल हा दिवस “जागतिक हिवताप दिन” म्हणून साजरा केला जातो. हिवताप (मलेरिया) हा डासांद्वारे पसरणारा गंभीर संसर्गजन्य रोग असून त्याच्या प्रतिबंधासाठी जनजागृती करणे अत्यंत आवश्यक आहे. याच पार्श्वभूमीवर यंदाचा जागतिक हिवताप दिन विविध जनजागृती उपक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला.



         यावर्षी “हिवताप दूरीकरणासाठी कटिबद्ध, आता हे शक्य आहे... आता हे केलेच पाहिजे!” या घोषवाक्याखाली हिवताप विभाग अहिल्यानगर शहर व अहिल्यानगर महानगरपालिका, आरोग्य विभाग यांच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या माध्यमातून शहरातील नागरिकांमध्ये डास नियंत्रण व हिवताप प्रतिबंधाबाबत जागरूकता निर्माण करण्यावर भर देण्यात येत आहे.



       नागरिकांनी आपल्या परिसरात पाणी साचू न देणे, पाण्याची भांडी झाकून ठेवणे, आठवड्यातून एक दिवस ‘कोरडा दिवस’ पाळणे, मच्छरदाणीचा वापर करणे तसेच ताप आल्यास त्वरित रक्त तपासणी करून घेणे, असे महत्त्वपूर्ण आवाहन यावेळी करण्यात आले.



       आज जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. नारायण वायभासे, अहिल्यानगर आरोग्य विभागाचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. सतीश राजुरकर, साथरोग अधिकारी डॉ. सृष्टी बनसोडे, सिव्हिल नागरी आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. आरती डापसे, प्रयत्ना नर्सिंग स्कूलच्या प्राचार्य श्रीमती दीक्षा घाटविसावे, प्रभारी सहा. जि. हि. अधिकारी गजेंद्र सांगळे, तसेच आरोग्य पर्यवेक्षक विलास लटपटे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा हिवताप कार्यालय तसेच प्रयत्ना नर्सिंग स्कूल येथे जागतिक हिवताप दिन उत्साहात साजरा करण्यात आला.



       कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी हिवताप विभागाचे आरोग्य निरीक्षक पुरुषोत्तम आडेप, सिव्हिल नागरी आरोग्य केंद्रातील एलएचव्ही श्रीमती बांगर, आरोग्य सेविका मीना गुंड, सर्व आरोग्य सेविका, आशा स्वयंसेविका तसेच हिवताप विभागाचे आरोग्य कर्मचारी मनीष ईश्वरे, प्रशांत चव्हाण, अमोल दहातोंडे, विशाल शिंदे आणि दत्ता सातपुते यांनी विशेष प्रयत्न केले.



  बिबी. हिवतापमुक्त समाज निर्माण करण्यासाठी प्रशासनाबरोबरच नागरिकांचा सक्रिय सहभाग अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यामुळे सर्व नागरिकांनी या मोहिमेत सहभागी होऊन स्वच्छता व प्रतिबंधात्मक उपाययोजना काटेकोरपणे पाळाव्यात, असे आवाहन जिल्हा हिवताप कार्यालय तसेच अहिल्यानगर महानगरपालिका आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

Post a Comment

For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com

أحدث أقدم