श्री समर्थ विद्या मंदिर प्रशाला प्राथमिक विभाग येथे विद्यार्थ्यांच्या कर्तृत्वाचा सन्मान करणारा कौतुक सोहळा संपन्न
नगर - शैक्षणिक वर्ष २०२५/२०२६ मध्ये विविध स्पर्धा परीक्षांमध्ये मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांनी प्राविण्य मिळवणे ही शाळेसाठी अभिमानाची बाब असून, या यशामागे विद्यार्थी, पालक आणि शिक्षक यांची वर्षभराची सातत्यपूर्ण मेहनत आहे, असे प्रतिपादन कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री. सुरेश क्षीरसागर यांनी केले. भविष्यात हेच विद्यार्थी जागतिक स्तरावर आपल्या पालकांचे तसेच संस्थेचे आणि शाळेचे नाव उज्ज्वल करतील आणि श्री समर्थ विद्या मंदिर प्रशालेचे “समर्थरत्न” म्हणून नावारूपाला येतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
श्री समर्थ विद्या मंदिर प्रशाला, प्राथमिक विभागाच्या वतीने आयोजित विविध स्पर्धा परीक्षा प्राविण्य प्राप्त विद्यार्थी कौतुक सोहळा उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान श्री समर्थ विद्या प्रसारक मंडळाचे सेक्रेटरी व शालेय समिती, प्राथमिक विभागाचे चेअरमन श्री. सुरेश क्षीरसागर यांनी भूषविले.
यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष श्री. दीपक ओहोळ, माध्यमिक विभागाच्या प्राचार्या सौ. वसुधा जोशी तसेच प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका सौ. धनश्री गुंफेकर उपस्थित होत्या.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात मुख्याध्यापिका सौ. धनश्री गुंफेकर यांनी विद्यार्थ्यांच्या यशाचा गौरव करत सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले. इयत्ता पहिली ते चौथीच्या ८० हून अधिक विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धा परीक्षांमध्ये उल्लेखनीय यश संपादन केल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच अहिल्यानगर महानगरपालिका आयोजित सांस्कृतिक स्पर्धेत विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या धनगर नृत्याला मिळालेला द्वितीय क्रमांक हा अभिमानास्पद असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
कार्यक्रमाची सुरुवात संगीत शिक्षिका सौ. खणकर यांनी सादर केलेल्या सुरेल स्वागतगीताने झाली.
यावेळी अध्यक्ष श्री. सुरेश क्षीरसागर व उपाध्यक्ष श्री. दीपक ओहोळ यांच्या हस्ते वर्षभरात विविध स्पर्धा परीक्षांमध्ये प्राविण्य मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा, त्यांच्या पालकांचा तसेच मार्गदर्शक शिक्षकांचा सन्मान करण्यात आला.
इयत्ता चौथीतील कु. काव्या भालेराव हिने आपल्या मनोगतातून शाळा व शिक्षकांविषयी कृतज्ञता व्यक्त केली. तर पालक प्रतिनिधी सौ. अमृता कुलकर्णी यांनी आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी इंग्रजी माध्यम न निवडता मराठी माध्यमाच्या शाळेला दिलेल्या प्राधान्याचा अभिमान व्यक्त करत श्री समर्थ विद्या मंदिर प्रशालेबद्दल समाधान व्यक्त केले.
शिक्षक मनोगतात गणेश पारधे यांनी संस्थेचे व मुख्याध्यापकांचे प्रोत्साहन मिळाल्यामुळे अध्यापनात अधिक सखोलता आणण्याची प्रेरणा मिळते, असे सांगितले.
अध्यक्ष परिचय गीतांजली शेरकर यांनी करून दिला. यादिवचन पूजा खटावकर व सुप्रिया डबीर यांनी तर आभार प्रदर्शन विद्या नरवडे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अंजली देशपांडे यांनी केले.

إرسال تعليق
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com