८६ हजारांचा मुद्देमाल जागेवरच नष्ट
नगर : दर्शक ।
एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या हद्दीत अवैध रित्या सुरु असलेल्या गावठी दारू अड्ड्यांवर पोलिसांनी धडक कारवाई केली आहे. नगर तालुक्यातील निमगाव घाणा आणि टाकळी खातगाव परिसरात सुरू असलेल्या या अवैध धंद्यावर छापा टाकून पोलिसांनी सुमारे ८६ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जागेवरच नष्ट केला असून, तीन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
स.पो.नि.माणिक चौधरी यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार २८ मे रोजी एम आयडीसी पोलिसांच्या पथकाने निमगाव घाणा व टाकळी खातगाव येथे धाड टाकली. या कारवाईत पोलिसांनी रसायन मिश्रित गावठी दारू तयार करण्याचे साहित्य जप्त केले.
यामध्ये निमगाव घाणा येथे आरोपी राजू सखाराम गव्हाणे (वय ४५) याच्या घराजवळील शेडमध्ये ५० हजार रुपये किमतीचे १००० लिटर कच्चे रसायन आणि २० हजार रुपयांची २०० लिटर तयार दारू पोलिसांनी नष्ट केली. टाकळी खातगाव येथे आरोपी राजेंद्र विलास पवार (वय २२) याच्या घराजवळील ओढ्यात ५ हजार रुपये किमतीचे १०० लिटर कच्चे रसायन व ४ हजार रुपयांची ४० लिटर दारू नष्ट केली. तसेच टाकळी खातगाव परिसरातील आरोपी विनोद दिलीप पवार (वय २२) याच्या ठिकाणाहून ४ हजार रुपयांचे ८० लिटर कच्चे रसायन व ३ हजार रुपयांची ३० लिटर दारू जप्त करून नष्ट करण्यात आली.
या तिन्ही आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्यावर महाराष्ट्र दारूबंदी कायद्याच्या कलम ६५ (ई) अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. एमआयडीसी पोलीस पुढील तपास करत आहेत. ही कारवाई अहिल्यानगरचे पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी शिरीष वमने यांच्या मार्गदर्शनाखाली स.पो. नि. माणिक चौधरी, उपनिरीक्षक विनोद परदेशी, पोलिस अंमलदार मुकुंद दुधाळ, किशोर जाधव, सचिन हरदास, अक्षय रोहोकले, सुरज देशमुख आणि उमेश शेरकर यांच्या पथकाने केली.

0 टिप्पण्या
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com