बंगाल चौकी परिसरातील घटना, ४ महिलांवर गुन्हा दाखल

Nagar Crime News | पूर्ववैमनस्यातून एका महिलेसह तिच्या आईला बेदम मारहाण



नगर - शहर परिसरातील बंगाल चौकी जवळील बर्फाच्या दुकानासमोर एका महिलेला आणि तिच्या आईला लाकडी दांडक्याने व दगडाने बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात चार महिलांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.



याबाबत वनिता रामदास जगधने ( रा. श्रीकृष्णनगर, केडगाव) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादी यांनी आरोपींना 'माझ्या आईला धक्काबुक्की का केली?' असा जाब विचारला होता. याचाच राग मनात धरून आरोपी बारकी अशोक क्षिरसागर, दगी नितीन क्षिरसागर, मनिषा युवराज रणशिंग आणि तनु (पूर्ण नाव माहीत नाही, सर्व रा. रामवाडी, सर्जेपुरा) यांनी मिळून फिर्यादी महिला आणि त्यांच्या आईला गाठले. आरोपींनी दोन्ही महिलांना रस्त्यावरच लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. एवढ्यावरच न थांबता आरोपींनी लाकडी दांडके आणि दगडाने पीडित महिलेच्या पाठीवर गंभीर वार करून तिला जखमी केले.



या घटनेदरम्यान आरोपींनी दोन्ही महिलांना शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकीही दिली. या हल्ल्यानंतर जखमी महिलेला उपचारासाठी तातडीने सिव्हील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. याप्रकरणी पीडित महिलेने कोतवाली पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी ४ महिलांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.