New Arts College | स्पुक्टो संघटनेचा सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त जिल्हा कृतज्ञता सोहळा उत्साहात पार पडला
नगर : दर्शक ।
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि महाविद्यालयीन अध्यापक संघटना (स्पुक्टो) अहिल्यानगर शाखेच्या वतीने संघटनेच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त जिल्हा कृतज्ञता सोहळ्याचे आयोजन न्यू आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स कॉलेज, अहिल्यानगर येथे मोठ्या उत्साहात पार पडले.
या कार्यक्रमात पन्नास वर्षांच्या यशस्वी वाटचालीचा गौरव करण्यात आला तसेच शिक्षण क्षेत्रातील मान्यवर प्राध्यापक, ज्येष्ठ माजी पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करून त्यांना सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाली. प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. सर्जेराव निमसे, माजी कुलगुरू, केंद्रीय विद्यापीठ लखनौ उपस्थित होते तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संघटनेचे संस्थापक सरचिटणीस व ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ प्राचार्य डॉ. खासेराव शितोळे होते.
याप्रसंगी महाराष्ट्र राज्य प्राध्यापक महासंघाचे अध्यक्ष डॉ. शामराव लवांडे, सुवर्ण महोत्सव संयोजन समितीचे अध्यक्ष डॉ. के. एल. गिरमकर, स्पुक्टोचे अध्यक्ष प्रकाश वाळूंज, उपाध्यक्ष डॉ. शिवाजी भोसले, सरचिटणीस डॉ. प्रवीण ताटे देशमुख, जिल्हाध्यक्ष डॉ. बाबासाहेब पवार, सरचिटणीस डॉ. रघुनाथ नजन तसेच पुणे जिल्हा स्पुक्टो अध्यक्ष डॉ. उत्तम पठारे, सरचिटणीस डॉ. अमर भोसले, अधिसभा सदस्य डॉ. सुनील लोखंडे, डॉ. बाळासाहेब सागडे, प्रा. संदीप पालवे, सदस्य व्यवस्थापन परिषद, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि विविध महाविद्यालयातील २०० पेक्षा अधिक प्राध्यापक उपस्थित होते.
संघटनेचा सुवर्ण प्रवास
स्वागतपर प्रास्ताविक करताना संघटनेचे सरचिटणीस डॉ. रघुनाथ नजन यांनी संघटनेच्या सुवर्णमहोत्सवी वर्षाच्या निमित्ताने संघटनेच्या कामगिरीचा गतकाळातील चढता आलेख मांडला. या प्रसंगी संघटनेच्या सर्व माजी पदाधिकारी यांनी संघटनेत काम करताना शैक्षणिक क्षेत्रात विशेष योगदान दिल्याबद्दल त्यांचा प्रमुख मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह, शॉल व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. डॉ. एस. बी. शेलार व डॉ. व्ही. एस. काळे यांनी माजी पदाधिकारी म्हणून आपले मनोगत व्यक्त करताना संघटनेची आजच्या काळातील गरज आणि संघटनेची शक्ती काय असते याविषयी अनुभव सांगितले.
प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना माजी कुलगुरू डॉ. सर्जेराव निमसे यांनी संघटनेच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त स्पुक्टोच्या माजी पदाधिकारी यांना निमंत्रित करून कृतज्ञतेचा सोहळा आयोजित केल्याबद्दल आयोजकांचे कौतुक केले. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० या धोरणाचा विकेंद्रीकरण हा आत्मा आहे, मात्र प्रत्यक्ष अमलबजावणीत त्याचा विसर पडल्याचे दिसते असे त्यांनी स्पष्ट केले.
राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची आवश्यकता विषद करताना भारतातील आजवरची शैक्षणिक धोरणे आणि त्यांची फलनिष्पत्ती यावर भाष्य केले. आजच्या धोरणाची अंमलबजावणी करताना आवश्यक पायाभूत सुविधांकडे दुर्लक्ष होत असल्याबाबत त्यांनी परखड मत व्यक्त केले. विद्यापीठ अनुदान आयोगाने जाहीर केलेल्या अभ्यासक्रम मसुद्यात वैज्ञानिक दृष्टीकोनाचा अभाव असल्याचे त्यांनी नमूद केले. सर्व विद्यापीठातील अभ्यास मंडळांनी योग्य पद्धतीने अभ्यासक्रम तयार करण्याची गरज असल्याचे सांगून राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात स्थानिक घटकांवर आधारित लवचिकतेस प्राधान्य दिल्यास अपेक्षित परिणाम साधता येतील, असे प्रतिपादन त्यांनी केले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. खासेराव शितोळे यांनी संघटनेची सुरुवातीची बांधणी करताना आलेल्या अडचणी, संघर्ष आणि अनुभव मांडले. आजच्या पिढीतील प्राध्यापकांना प्राध्यापकी पेशाबरोबरच संघटनेची आवश्यकता का असते, संघटन शक्तीतून कसे विधायक कार्य करता येते याबद्दल त्यांनी मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमात २००५ नंतरच्या प्राध्यापकांसाठी निवृत्ती वेतन योजना : काल, आज आणि उद्या या विषयावर डॉ. सोमनाथ वाघमारे, समन्वयक जुनी पेंशन हक्क कृती समिती महाराष्ट्र राज्य यांचे व्याख्यानही आयोजित करण्यात आले. कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन डॉ. जितेंद्र पाटील यांनी केले तर आभारप्रदर्शन डॉ. अविनाश फलके यांनी केले.
अहिल्यानगर जिल्ह्यातील सर्व शाखेतील संघटनेचे पदाधिकारी व सभासदांच्या मोठ्या उपस्थितीमुळे हा सोहळा अतिशय अविस्मरणीय ठरला.


0 टिप्पण्या
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com