Ayushman Bharat Nagar | गरीब रुग्णांचे जीवन वाचवणे हाच खरा धर्म - सुजय विखे पाटील

 आयुष्मान भारत व महात्मा फुले जन आरोग्य योजना समितीवर अमित महाराज घाडगे विशेष निमंत्रित सदस्य

गरीब रुग्णांचे जीवन वाचवणे हाच खरा धर्म - सुजय विखे पाटील



नगर : दर्शक । 

आयुष्मान भारत व महात्मा फुले जन आरोग्य योजना ही प्रधानमंत्री नरेंद्र मोदी व राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महत्त्वाकांक्षी व लोकाभिमुख योजना आहे. गरीब व गरजू रुग्णांना आरोग्य सेवेचा योग्य लाभ मिळावा, यासाठी प्रत्येक जिल्ह्यात पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली संरक्षण समिती स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या समितीवर अहिल्यानगर जिल्ह्यातील समाजकार्याशी निगडित नावाजलेले कीर्तनकार व व्याख्याते अमित महाराज घाडगे यांची विशेष निमंत्रित सदस्य म्हणून निवड झाली आहे.




     ही निवड जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या सूचनेवरून करण्यात आली असून, त्यांनी अमित महाराजांना विशेष सूचना दिल्या आहेत की नगर जिल्ह्यात पैशाअभावी एकही रुग्ण उपचारापासून वंचित राहणार नाही, याची दक्षता घ्यावी.




     या योजनेत महाराष्ट्रातील सर्व रेशन कार्डधारकांना आता लाभार्थी म्हणून सामील करण्यात आले आहे. याअंतर्गत पूर्वी 1,356 आजारांवर मोफत उपचार मिळत असत; परंतु आता ते वाढून तब्बल 2,399 इतके झाले आहेत. तसेच महाराष्ट्रातील तब्बल 4,180 रुग्णालयांना या योजनेत सामील करून घेतले आहे. या रुग्णालयांना योग्य मोबदला मिळावा म्हणून उपचार दरपत्रकात मोठी वाढ करण्यात आली आहे, अशी माहिती योजनेचे महाराष्ट्र राज्याध्यक्ष ओमप्रकाश शेटे यांनी दिली.




     अमित महाराज घाडगे यांच्या निवडीबद्दल शहराचे आमदार संग्राम जगताप, राहुरीचे आमदार शिवाजीराव कर्डिले, पाथर्डीच्या आमदार मोनिका राजे, श्रीगोंदाचे आमदार विक्रम पाचपुते, माजी नगरसेवक धनंजय जाधव यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. तसेच माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनीही त्यांचा विशेष सत्कार करून अभिनंदन केले.यावेळी भाजपा शहर जिल्हाध्यक्ष अनिलजी मोहिते,मा. नगरसेवक धनंजय जाधव,भाजपा. जिल्हा सरचिटणीस मा.निखिल वारे,केमिस्ट असो.चे जिल्हाध्यक्ष दत्ता गाडळकर यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.



    समाजातील सर्व स्तरांमधून या निवडीचे स्वागत होत आहे.


     अमित महाराज घाडगे हे वारकरी संप्रदायाचे संस्कार लाभलेले असून समाजसेवेची आवड त्यांना लहानपणापासूनच आहे. रुग्णसेवा, भजन-कीर्तन व जनजागृतीच्या माध्यमातून ते गेल्या अनेक वर्षांपासून लोकसेवा करत आहेत. त्यामुळेच ही निवड त्यांच्यावर झालेला विश्‍वास असल्याचे मानले जात आहे.




     यावेळी बोलताना माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील म्हणाले, आयुष्मान भारत व महात्मा फुले जन आरोग्य योजना ही गरीबांच्या आयुष्यासाठी आधारवड ठरणारी योजना आहे. आज अनेक कुटुंबे एका गंभीर आजारामुळे उध्वस्त होताना दिसतात. अशा वेळी ही योजना त्यांना नवा जीवनदायी श्‍वास देते. 



अमित महाराज घाडगे यांची समितीवर झालेली निवड म्हणजे या कार्याला समाजसेवेची जोड मिळणे होय. गरीब रुग्णांचे जीवन वाचवणे हाच खरा धर्म असून, ही जबाबदारी आता अधिक प्रभावीपणे पार पाडली जाईल, असा विश्‍वास मला वाटतो. पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली अहिल्यानगर जिल्हा राज्यात आदर्श ठरेल. गरीब, शेतकरी, मजूर, कामगार यांच्या घराघरात या योजनेचा फायदा पोहोचला पाहिजे, यासाठी समितीने एकत्रितपणे काम करणे आवश्यक आहे.




     सत्काराला उत्तर देताना अमित महाराज घाडगे म्हणाले, ही निवड माझ्यावर झालेला विश्‍वास आणि जबाबदारी आहे. आयुष्मान भारत व महात्मा फुले जन आरोग्य योजना ही केवळ योजना नसून गरीब रुग्णांचे जीवन वाचवण्याचा संकल्प आहे. वारकरी संप्रदायाच्या संस्कारातून मला सेवा, दया आणि करुणेची शिकवण मिळाली आहे. 



त्या भावनेतूनच मी रुग्णसेवा आणि समाजसेवा करत आलो आहे. पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांनी दिलेल्या सूचनांनुसार अहिल्यानगर जिल्ह्यात पैशाअभावी एकही रुग्ण उपचारापासून वंचित राहणार नाही, यासाठी मी सर्वतोपरी प्रयत्न करीन. या कार्यात समाजातील सर्वांचे सहकार्य लाभेल, असा मला विश्‍वास आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या