Sina Pool Nagar | कल्याण महामार्गावरील सीना नदीवरील उड्डाणपुलाचे काम त्वरित पूर्ण करा ; सौ. स्वाती सिरसुल यांची मागणी
नगर – गेल्या दीड ते दोन वर्षांपूर्वी सुरू करण्यात आलेल्या नालेगावजवळील कल्याण महामार्गावरील सीना नदीवरील उड्डाणपुलाचे काम अद्यापही प्राथमिक अवस्थेतच आहे. कामाचा वेग अत्यंत मंद असून पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांचे हाल वाढले आहेत. या पुलाचे काम तातडीने पूर्ण करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्त्या सौ. स्वाती सिरसुल यांनी केली आहे.
गेल्या चार-पाच दिवसांपासून नगर शहर व परिसरात मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले आहे. सीना नदीला महापूर आल्याने महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे कोलमडली आहे. नदीपलीकडील आदर्शनगर, श्रीकृष्णनगर, विद्यानगर, साईराम सोसायटी, जाधवनगर व शिवाजीनगरसारख्या वस्त्यांमध्ये हजारो लोक राहतात. रोजगार व कामानिमित्त रोज शहरात ये-जा करणाऱ्या गोरगरिबांचा संपर्क तुटल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. विशेषतः शिवाजीनगर भागातील मजुरांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
दरम्यान, सीना नदी दुथडी भरून वाहत असल्याने शिवाजीनगर परिसरातील गटार व चेंबरमधून पाणी उलट दिशेने घरात शिरत आहे. अनेक सोसायटींमध्ये घाणीचे पाणी गुडघ्यापर्यंत साचल्याने रहिवासी हैराण झाले आहेत. नवरात्रीच्या दिवसांत घराघरांत चालणारे पूजन-पाठ पाण्याखाली गेल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. “देव पाण्याखाली गेले, आता सामान्यांच्या व्यथा कोण ऐकणार?” असा प्रश्नही नागरिकांनी उपस्थित केला आहे.
कल्याण–विशाखापट्टणम राष्ट्रीय महामार्गाची अवस्था दिवसेंदिवस बिकट होत आहे. रस्त्यावरील खड्डे व चिखलामुळे पादचारी व वाहनधारकांचे अपघात वाढले आहेत. महामार्गावर माळशेज घाट, कल्याण, भिवंडी, मुंबई, शिर्डी, पुण्याकडे जाणारी मोठ्या वाहनांची रहदारी सुरूच असते. नुकत्याच झालेल्या गणेशोत्सवातील विसर्जनानंतर नदीकाठी जमा झालेला गाळ, मूर्ती व प्लास्टर ऑफ पॅरिसचा चिखल रस्त्यावर टाकण्यात आला. मुसळधार पावसामुळे हा गाळ रस्त्यावर पसरला असून त्यातून दुर्गंधी निर्माण झाली आहे. मोकाट जनावरे व कुत्र्यांची रेलचेल वाढल्याने दातरंगे मळा, नालेगाव भागातील नागरिक आरोग्य धोक्याबाबत चिंतेत आहेत.
गेल्या दोन दिवसांपासून सीना नदीतील पाण्याची पातळी वाढल्याने नालेगाव व वारोळामारुतीजवळील जुना पूल पूर्णपणे पाण्याखाली गेला आहे. त्यामुळे कल्याण महामार्गावरील माधवनगर मार्गे बायपासने होणारी वाहतूक बंद झाली आहे. या भागातील रहिवासी नदीच्या पलीकडे अडकून पडले असून नगर शहरातील नागरिकांनाही पलीकडे जाता येत नाही.
या गंभीर परिस्थितीत नागरिक त्रस्त झाले आहेत. म्हणूनच सीना नदीवरील उड्डाणपुलाचे काम युद्धपातळीवर पूर्ण करून, नदीपलीकडील नागरिक व हजारो वाहनधारकांना दिलासा द्यावा, अशी मागणी सौ. स्वाती सिरसुल यांनी प्रशासनाकडे केली आहे. त्यांनी, “समस्या डोळ्यांसमोर असूनही प्रशासन मौन बाळगून बसले आहे. काम गतीने पूर्ण झाले नाही, तर सामान्य जनतेचे जगणे कठीण होईल,” अशी खंत व्यक्त केली आहे.

0 टिप्पण्या
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com