Aanganwadi | बालविकास नागरी प्रकल्पाचा पोषण माह व पालक मेळावा उत्साहात
नगर : दर्शक ।
बालकांचे शारीरिक व मानसिक आरोग्य चांगले राहण्यासाठी त्यांना पोषक आहार मिळणे गरजेचे असते, त्यासाठी बालविकास प्रकल्पातील अधिकारी व कर्मचारी चांगले काम करीत आहेत. आजचे बालक देशाचे भविष्य आहेत. त्यांची चांगली काळजी अंगणवाडी सेविका व मदतनीस घेत आहेत, ही स्तुत्य बाब आहे, असे प्रतिपादन डॉ. समरीन वधवा यांनी केले.
अहिल्यानगर शहरात बालविकास प्रकल्प अधिकारी (नागरी), अहिल्यानगर यांच्या प्रकल्पांतर्गत मंगलगेट येथील श्री समर्थ आवजीनाथबाबा सांस्कृतिक भवन येथे आयोजित करण्यात आलेल्या पोषण माह कार्यक्रम व पालक मेळाव्यात त्या बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बालविकास प्रकल्प अधिकारी महादेव जायभाये होते. या वेळी प्रकल्प अधिकारी केदार नांगरे, मयुरेश सुतार, पूजा धस, अनुजा मोमले, सुप्रिया जाधव, राधिका चिमटे आदी उपस्थित होते.
प्रकल्प अधिकारी महादेव जायभाये म्हणाले की, बालकांना अंगणवाडीत नियमित पोषक आहार मिळतो. अंगणवाडी सेविका व मदतनीस बालकांवर चांगले शिक्षण संस्कार करीत असतात. त्यासाठी पालकांचेही चांगले सहकार्य असते. पोषण आहार मासामध्ये 17 सप्टेंबर ते 16 ऑक्टोबर या दरम्यान विविध कार्यक्रम राबविण्यात आले.
या वेळी सेविका व मदतनीसांनी टाकाऊपासून टिकाऊ शैक्षणिक साहित्य, कलाकृती, तसेच पौष्टिक पाककृती बनवून आणल्या होत्या. त्याचे सर्वांनी कौतूक केले. कार्यक्रमास परिसरातील पालकांनीही भेट दिली.
कार्यक्रमास मुख्यसेविका सुरेखा गोसावी, सोनल मेहेत्रे, ऋतुजा पिंगळे, जयश्री पालवे, कोमल शिंदे आदी उपस्थित होत्या. कार्यक्रमासाठी ज्ञानेश्वर साळवे, शरद मुर्तडकर, लक्ष्मण साळवे आदींनी हॉल उपलब्ध करून दिला होता. प्रास्ताविक भावना कोहक यांनी केले. पाहुण्यांचा परिचय रेश्मा चावरिया यांनी करून दिला. सूत्रसंचालन नम्रता हजारे यांनी केले.
0 टिप्पण्या
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com