जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाजाचा दसरा महोत्सव उत्साहात साजरा
नगर - अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाजाचा दसरा महोत्सव उत्साहात व पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात आला. संस्थेच्या स्थापनेपासून सुरु असलेली ही परंपरा आजही तितक्याच जोशात टिकवली जात असून, सामाजिक परिवर्तन आणि शिक्षण क्षेत्रातील योगदान अधोरेखित करण्यात आले.
संस्थेच्या विविध शाळा व महाविद्यालयांतर्फे अतिवृष्टी व पुरग्रस्त शेतकर्यांसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये मदत रक्कम जमा करण्यात येणार असल्याची घोषणा यावेळी करण्यात आली. या निमित्ताने संस्थेचे अध्यक्ष रामचंद्र दरे म्हणाले, जिल्हा मराठा संस्थेची उभारणी मध्ये चौथे छत्रपती शिवाजी महाराजांनी रुजविलेल्या समाजधर्माची परंपरा पुढे नेण्याचा प्रयत्न आहे. दिवंगत संस्थापक पदाधिकार्यांच्या स्मृती जपण्याचा व त्यांच्या कार्याला पुढे नेण्याचा हा महोत्सव एक मार्ग आहे.
यावेळी उपाध्यक्ष डॉ. विवेक भापकर, खजिनदार अॅड. दीपलक्ष्मी म्हसे-पाटील, विश्वस्त जी. डी. खानदेशे, नंदकुमार झावरे, मुकेश मुळे, सिताराम खिलारी, जयंत वाघ, चंद्रराव मोरे आदी मान्यवर उपस्थित होते.
अध्यक्ष दरे पुढे म्हणाले, शिक्षक, प्राध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचारी हेच संस्थेचा आत्मा आहेत. सर्वांच्या सहकार्यानेच आपण राज्यात शिक्षण क्षेत्रात अग्रेसर राहिलो आहोत. आमचा भर नेहमीच कृतीवर असतो, केवळ बोलण्यावर नाही.
या महोत्सवात राष्ट्रीय, राज्य व जिल्हा पातळीवर उल्लेखनीय यश मिळविलेल्या तसेच विविध क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणार्या प्राचार्य, प्राध्यापक, शिक्षक आणि विद्यार्थ्यांचा सत्कार पदाधिकार्यांच्या हस्ते करण्यात आला.
कार्यक्रमात जयंत वाघ, नंदकुमार झावरे, अॅड. दीपलक्ष्मी म्हसे, सिताराम खिलारी यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
प्रास्ताविक विजयकुमार पोकळे यांनी केले, तर कार्यक्रमाचा अहवाल मुकेश मुळे यांनी सादर केला. सूत्रसंचालन रवींद्र देठे यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्राचार्य बी.बी. सागडे यांनी मानले.

0 टिप्पण्या
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com