जैन मंदिर ट्रस्ट भूखंड वाद : आनंदऋषीजी समाधीसमोर शपथ घेऊन १८ प्रश्नांची उत्तरं द्या — मनोज गुंदेचा यांचे खुले आव्हान
नगर : दर्शक ।: जैन मंदिर ट्रस्ट भूखंड हडप करत त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्यालय थाटल्याचा आरोप ठाकरे शिवसेनेचे शहर प्रमुख किरण काळे यांनी केला होता. धर्मदाय आयुक्तांकडे तशी तक्रार त्यांनी केली होती. त्यानंतर ट्रस्ट अध्यक्ष सुभाष मुथा, भाडेकरू गणेश गोंडाळ यांनी काळे यांचे आरोप खोटे, दिशाभूल करणारे असल्याचा आरोप केला होता.
सर्व प्रश्नांची तुम्ही खरी आणि पुराव्यांसह उत्तर दिली तर किरण काळे हे शहर लोकप्रतिनिधी, समाजाची नाक रगडून बिनशर्त माफी मागतील
त्यावर आता जैन समाजाचे मनोज सुवालाल गुंदेचा यांनी अनेक प्रश्न उपस्थित करत ट्रस्टचे अध्यक्ष मुथा, भाडेकरू गोंडाळ, शहर लोकप्रतिनिधींना काही प्रश्न केले आहेत. तुमच्यात नैतिकता शिल्लक असेल तर राष्ट्रसंत आनंदऋषीजी महाराज साहेबांच्या समाधीसमोर शपथ घेऊन "या १८ प्रश्नांची" पुराव्यांसह उत्तरे द्या, असे खुले आव्हान दिले आहे. या सर्व प्रश्नांची तुम्ही खरी आणि पुराव्यांसह उत्तर दिली तर किरण काळे हे शहर लोकप्रतिनिधी, समाजाची नाक रगडून बिनशर्त माफी मागतील. सर्व आरोप मागे घेतील, असे मनोज गुंदेचा यांनी म्हटले आहे.
गुंदेचा यांचे जाहीर सवाल :
१) खोटी आणि दिशाभूल करणारी माहिती समाजाला देऊन तुम्ही कोणता अर्थपूर्ण स्वार्थ साधत आहात ?
२) मंगूबाई हिरालाल व्होरा यांनी भूखंड धर्म कार्यासाठी दान केला होता. १९८७ ला ट्रस्टचे नाव उताऱ्यावर लागले आहे. आज पर्यंत ट्रस्टने या जागेत कोणते धर्म कार्य केले ?
३) तुम्ही सांगितले की इथे कधीही कोणीही साधू, संत आले नाही. मग या जागेचा तुम्ही केवळ वैयक्तिक अर्थपूर्ण हितसंबंधा साठीच आजवर वापर केला का ? तुम्ही देणगीदार मयत मातेची फसवणूक नाही केली का ?
४) मृत्युपत्रात सात भाडेकरूंची नोंद आहे. अन्य सहा भाडेकरू जागा सोडून का गेले ?
५) त्यांना कुणी पळवून लावले ? त्या भाडेकरूंना जागा कोणी खाली करायला लावली ?
६) सहा भाडेकरू गेले मात्र एक तथाकथित स्वयंघोषित भाडेकरूच कसं काय त्या ठिकाणी राहिला ?
७) मृत्युपत्रात सातवा भाडेकरू हरिभाऊ महादू गोंडाळ हा होता. त्याला केवळ एक खोली २८ रुपये भाड्याने दिली होती. तो मयत झाला आहे. त्यानंतर ती खोली ट्रस्टच्या ताब्यात का नाही घेतली ?
९) मृत्युपत्रात ही जागा कोणासही कोणत्याही कारणासाठी देऊ नये असा स्पष्ट उल्लेख देणगीदाराने केलेला असून देखील गणेश गोंडाळ नामक व्यक्तीने या भूखंडाचा ताबा कसा काय घेतला ? त्याच्या वडिलांच्या ताब्यात असणारी एक खोली अचानक संपूर्ण ५००० स्क्वेअर फिटच्या भूखंडात कशी काय परावर्तित झाली ? मृत्युपत्रामध्ये गणेश गोंडाळ याचा भाडेकरू म्हणून कुठे उल्लेख आहे का ?
१०) त्यासाठी धर्मदाय आयुक्त यांची नियमाप्रमाणे पूर्वपरवानगी घेतली आहे का ? ती तुम्ही समाजाला दाखवाल का ?
११) या जागेवर असणारी हुंडेकरी चाळ बुलडोजर लावून रात्रीतून कोणी पाडली ?
१२) या जागेवर राजकीय कार्यालय थाटत केलेले बांधकाम ट्रस्टने केले आहे की अन्य कोणी ? या ठिकाणी शहर लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत राष्ट्रवादीचे कार्यालय सुरू असल्याचे टेम्पो भरून फोटो आम्ही दाखवले ते खोटे आहेत का ?
१३) या बांधकामाची मनपाची परवानगी घेतली आहे का ? ती तुम्ही समाजाला दाखवाल का ?
१४) राजकीय कार्यकर्ता असणाऱ्या सध्याच्या तथाकथित भाडेकरू कडून आजवर ट्रस्टच्या अध्यक्षांनी किती रक्कम बेकायदेशीर रित्या घेतली आहे ?
१५) ट्रस्ट अध्यक्ष यांनी स्वतःच्या आर्थिक अडचणी दूर करण्यासाठी राजकीय नेत्या बरोबर तडजोड करून ट्रस्टची जागा संगनमत करून परस्पर विक्रीचा घाट घातला होता का ?
१६) ट्रस्ट विक्रीचा निर्णय घेतल्याचे तुम्ही सांगितले. जागा विक्रीची जाहीर नोटीस ही ट्रस्टने जारी केली होती. ती प्रसिद्ध करण्यापूर्वी धर्मदाय कार्यालयाची परवानगी घेतल्याचा पुरावा तुम्ही समाजाला कधी देणार ?
१७) मुळात ही जागा कधीही कुणाला विकू नये असे मृत्युपत्रात स्पष्ट म्हटलेले असताना, ते तुम्हाला ज्ञात असताना देखील तुम्ही हा घाट कोणत्या राजकीय नेत्याच्या दबावातून घातला ? विक्री नोटीस कोणी द्यायला भाग पाडले?
१८) धर्म कार्यासाठीच्या ट्रस्टचे तुम्ही विश्वस्त, रखवालदार आहात की शहर लोकप्रतिनिधींचे प्रवक्ते ?

0 टिप्पण्या
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com