शासकीय रुग्णालयांतील शुल्क आकारणीचा शासन निर्णय तात्काळ रद्द करण्याची मुख्यमंत्र्यांकडे किरण काळेंची मागणी
नगर : दर्शक ।
आता शासकीय रुग्णालयांमध्ये उपचारांसाठी शुल्क आकारणी करण्याचा निर्णय राज्य सरकारच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने घेण्यात आला आहे. याबाबतची "सुधारित व अद्यावत नागरिकांची सनद" नुकतीच जारी करण्यात आली आहे.
यापूर्वी ही सुविधा पूर्णतः मोफत होती. सरकारच्या या शासन निर्णयावर अहिल्यानगर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष्याच्या वतीने तीव्र हरकत घेण्यात आली आहे. सर्वसामान्य नागरिक, गोरगरीब जनतेवर अन्याय करणारा हा शासन निर्णय तात्काळ रद्द करण्यात यावा, अशी मागणी लेखी निवेदनाद्वारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे ठाकरे शिवसेनेचे महानगर प्रमुख किरण काळे यांनी केली आहे.
किरण काळे यांनी निवेदनात म्हटले आहे, या निर्णयामुळे सर्वसामान्य माणसाचं जगणं मुश्किल होणार आहे. यापूर्वी राज्यातील जिल्हा रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय तसेच महानगरपालिका रुग्णालयांमध्ये नागरिकांना मोफत आरोग्य सेवा मिळत होती. याचा राज्यातील कोट्यावधी नागरिक लाभ घेत होते.
मात्र आता आरोग्य विभागाने घेतलेला निर्णय हा सर्वसामान्य माणसाला, गोरगरीब जनतेला आरोग्या सारख्या मूलभूत सुविधे पासून वंचित ठेवणारा आहे. देशातील अनेक राज्यांमध्ये आरोग्याचा पूर्ण खर्च हा सरकार उचलते. मात्र महाराष्ट्र याला दुर्दैवाने अपवाद ठरला आहे. हे शासन गोरगरिबांसाठी आहे की धन दांडग्यांसाठी, मूठभर उद्योगपतींसाठी आहे, असा संतप्त सवाल काळे यांनी उपस्थित केला आहे.
राज्यातील दारिद्र्य रेषेखालील नागरिकांची संख्या आजही मोठी आहे. गोरगरीब, कष्टकरी, हातावर पोट भरणारे तसेच ग्रामीण भागातील मोठा समुदाय हा आर्थिक दुर्बलतेमुळे खाजगी रुग्णालयां मध्ये उपचार घेऊ शकत नाही. म्हणून तो शासकीय आरोग्य सुविधांवर अवलंबून आहे.
पैशां अभावी उपचार न मिळाल्यास राज्यातील कोट्यावधी लोकांचे जगणे असह्य होऊ शकते. त्यामुळे सर्वसामान्य नागरिक, गोरगरिबांची आरोग्य विषयक होणारी गैरसोय लक्षात घेता तात्काळ सदर अन्यायकारक शासन निर्णय राज्य सरकारने तात्काळ मागे घ्यावा, अशी मागणी ठाकरे शिवसेनेच्या वतीने निवेदनाद्वारे किरण काळे यांनी केली आहे. या निवेदनाची प्रत सार्वजनिक आरोग्य विभागाचे मंत्री ना. प्रकाश आबिटकर यांना पाठविण्यात आली आहे.
| सेवा | दर |
|---|---|
| केस पेपर | ५ रुपये |
| रुग्णवाहिका (प्रति किलोमीटर) | ५ रुपये |
| सोनोग्राफी | ५० रुपये |
| दात काढणे (एक दात) | १५ रुपये |
| इसीजी | २० रुपये |
| आयसीयु (प्रतिदिन) | १०० रुपये |
| फिटनेस प्रमाणपत्र | ५० रुपये |
| रक्त चाचणी | १५ रुपये |
| सांधा प्रत्यारोपण | ४०,००० रुपये |
| नर्सिंग चार्जेस (प्रति दिन) | ६० रुपये |
| दुसरे बाळंतपण | ५० रुपये |
| एमआरआय | १६०० रुपये |
| एक्स-रे | ३० रुपये |
| सिटीस्कॅन | ४०० रुपये |

إرسال تعليق
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com