ट्रस्ट अध्यक्ष मुथा, अन्य ट्रस्टींना पदावरून हटवून गुन्हे दाखल करण्याची काळेंची तक्रार
नगर : दर्शक ।
श्री ऋषभ संभव जिन जैन श्वेतांबर संघ (जैन मंदिर), कापड बाजार या ट्रस्टचा धार्मिक कार्यासाठी असणारा भूखंड हडपून त्या ठिकाणी राजकीय कार्यालय थाटल्याचा आरोप ठाकरे शिवसेनेचे शहरप्रमुख किरण काळे यांनी केला होता. याप्रकरणी माजी आ. रवींद्र धंगेकर आणि काळे यांनी सह धर्मादाय आयुक्त, पुणे यांची भेट घेऊन ट्रस्ट अध्यक्ष सुभाष मुथा, अन्य ट्रस्टींना पदावरून हटवून गुन्हे दाखल करण्याची तक्रार केली आहे. याबाबत चौकशी करण्याचे आश्वासन यावेळी सह धर्मदाय आयुक्त यांनी दिले.
काळे यांनी केलेल्या आरोपांचे मुथा यांनी ट्रस्टच्या वतीने खंडन केले होते. त्यानंतर काळे यांनी ही मागणी केली आहे. मंगूबाई व्होरा यांनी हा भूखंड केवळ धर्म कार्यासाठीच देणगी दिला होता. तो कोणालाही विकू नये अथवा अन्य करण्यासाठी देऊ नये याचा मृत्युपत्रामध्ये स्पष्ट उल्लेख असल्याचा पुनरुच्चार काळे यांनी केला आहे.
तक्रार अर्जात काळे यांनी म्हटले आहे, या गंभीर प्रकरणाचे तात्काळ सखोल चौकशी आदेश निर्गमित करावेत. ट्रस्ट अध्यक्ष सुभाष मुथा आणि अन्य सर्व ट्रस्टींना तात्काळ पदावरून हटवण्यात यावे. त्यांना ट्रस्टमध्ये पदाधिकारी होण्यासाठी कायमस्वरूपी अपात्र करण्यात यावे. ट्रस्टचे कामकाज आपल्या विशेष देखरेखी खाली करण्यात यावे. त्याकरिता प्रशासकाची नियुक्ती करावी.
अध्यक्ष मुथा, अन्य ट्रस्टींवर गुन्हा दाखल करा:
काळेंनी तक्रारीत म्हटले आहे, ट्रस्ट अध्यक्ष सुभाष मुथा आणि अन्य ट्रस्टींनी जाणून-बुजून, कट कारस्थान करून सदर कृत्य केल्याचे स्पष्टपणे दिसते आहे. सबब त्यांच्यावर कलम ६६, ६७ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावा. सदर हडप केलेला भूखंड गणेश गोंडाळ, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सत्ताधारी लोकप्रतिनिधी यांच्या कडून तात्काळ खाली करून घेण्याचे आदेश करावेत.

0 टिप्पण्या
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com