Top News

भीमराव माझा… झाला पहिला बॅरिस्टर; बौद्ध संस्कार संघाची भीमपहाट रंगली

 भीमराव माझा… झाला पहिला बॅरिस्टर; बौद्ध संस्कार संघाची भीमपहाट रंगली

भीमराव माझा… झाला पहिला बॅरिस्टर; बौद्ध संस्कार संघाची भीमपहाट रंगली






अहिल्यानगर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त बौद्ध संस्कार संघ परिवाराच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या भीमपहाट संगीत मैफिलीने छत्रपती संभाजीनगर रस्त्यावरील चेतना लॉन्स मंगल कार्यालय परिसर भीममय झाला. ‘नमो गौतमा’, ‘भीमा तुझं प्रणाम कोटी कोटी’, ‘अंगार विषमतेचा तुडवून भीम गेला’, ‘न घडणारे आमचे जीवन घडवून भीम गेला’, ‘राखिले कुळाचे नाव तू भीमराव’, ‘खरंच सांगतो भीमराव माझा झाला पहिला बॅरिस्टर’ अशा विविध भीमगीतांनी मंगळवारची पहाट उजळून निघाली.




       डॉ. आंबेडकरांच्या जीवनचरित्रावर आधारित गीतांचे सुरेख सादरीकरण कलाकारांनी केले. उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात दाद देत या मैफिलीचा आनंद लुटला. बौद्ध संस्कार संघाच्या वतीने मागील १७ वर्षांपासून भीमजयंतीच्या दिवशी भीमगीतांची पहाट मैफल आयोजित केली जाते. यंदा १८व्या वर्षी ‘ऑर्केस्ट्रा संगीत सितारे’ परिवाराचे सुप्रसिद्ध निवेदक व गायक विनय कसबेकर यांच्या नेतृत्वाखाली विविध भीमगीते सादर करण्यात आली.




       अहिल्यानगरचे सुप्रसिद्ध गायक अतुल थोरात यांनी ‘जय भीमवाले आले’ ही गीते सादर करत महाकवी वामनदादा कर्डक यांच्या रचनांना उजाळा दिला. महाराष्ट्रातील गायक नरेश बडेकर यांनी ‘पहाट झाली प्रभा म्हणाली भीम जयंती आली’, ‘राजा-राणीच्या जोडीला’ ही गीते सादर केली. तसेच शाहीर वसंत डंबाळे यांनी ‘भीमा तुझ्या महुला जाऊन काल मी आलो’ हे गीत सादर केले. गायिका आशा वडागळे आणि पल्लवी बोरुडे यांनीही आपल्या सादरीकरणाने रंगत वाढवली. साऊंड इंजिनियर शुभम नेटके यांनी ध्वनी संयोजनाची जबाबदारी सांभाळली.




         यावेळी सामाजिक कार्यकर्ते जालिंदर बोरुडे, स्मिता मनोरंजन रूपवते आणि डॉ. तारकेश्वर वानखेडे यांना समाजभूषण पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. हा सन्मान गुलाबराव खरात (मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद बुलढाणा), अभियंता पी. बी. गायसमुद्रे (जिल्हा जलसंधारण अधिकारी), भारती सागरे (उपजिल्हाधिकारी, बीड), आणि भाऊसाहेब सोनवणे (कृषी मंडळ अधिकारी बीड ) , इंजिनीयर किरण साळवे (सहाय्यक अभियंता जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा) यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.




या भीमपहाट मैफिलीला अवालवृद्धांची मोठी उपस्थिती होती. अनेकांनी टाळ्यांच्या ठेक्यावर साथ देत वातावरण भारावून टाकले. कार्यक्रमासाठी कीबोर्ड वादक नरेंद्र (सोनू) साळवे, ढोलक वादक निलेश उजागरे आणि ऑक्टोपॅडवर अभिनय कसबेकर यांनी साथसंगत केली.




        कार्यक्रमाचे प्रास्ताविक आयोजक भाऊसाहेब देठे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विविध प्रायोजकांचे सहकार्य लाभले.




        शेवटी, “यावेळी मोठ्या संख्येने आंबेडकरप्रेमी उपस्थित होते,” अशी माहिती आयोजकांनी दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. विजय साबळे आणि डॉ. प्राजक्ता सावेडकर यांनी केले.

Post a Comment

For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com

أحدث أقدم