Top News

गणेश जयंतीनिमित्त श्री एकदंत महिला मंडळातर्फे बथुकम्मा शोभायात्रा उत्साहात

 गणेश जयंतीनिमित्त श्री एकदंत महिला मंडळातर्फे बथुकम्मा शोभायात्रा उत्साहात 






नगर : दर्शक । 
गणेश जयंतीच्या पावन पर्वानिमित्त श्री एकदंत महिला मंडळाच्या वतीने तेलंगणा राज्यातील पारंपरिक बथुकम्मा सणाचे सांस्कृतिक दर्शन घडवणारा भव्य कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यानिमित्त महिलांनी आकर्षक फुलांनी सजवलेली बथुकम्मा डोक्यावर घेत श्री एकदंत कॉलनी परिसरातून भव्य व आनंदी वातावरणात शोभायात्रा काढली.


बथुकम्मा हा तेलंगणातील महिलांचा प्रमुख लोकउत्सव असून निसर्गपूजा, स्त्रीशक्ती आणि समृद्धीचे प्रतीक मानला जातो. पावसाळ्यानंतर उमलणाऱ्या विविध रंगीबेरंगी फुलांपासून बथुकम्माची रचना केली जाते. मातृशक्तीप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी व सामाजिक एकोपा वृद्धिंगत करण्यासाठी हा सण विशेष श्रद्धेने साजरा केला जातो. पद्मशाली समाजासह संपूर्ण तेलंगणा राज्यात या सणाला मोठे महत्त्व आहे.


      शोभायात्रेदरम्यान महिलांनी फुगड्या खेळत तसेच पारंपरिक सांस्कृतिक नृत्य सादर करत संपूर्ण परिसर आनंदाने दुमदुमून टाकला. ढोल-ताशांच्या गजरात आणि पारंपरिक गीतांच्या तालावर मिरवणूक अत्यंत उत्साही वातावरणात पुढे सरकत होती. प्रत्येक ठिकाणी बथुकम्मा नृत्य सादर होत असल्याने कॉलनी परिसरात उत्सवाचे रूप अधिकच खुलून दिसत होते.


या शोभायात्रेचे वैशिष्ट्य म्हणजे कॉलनी परिसरातील नागरिकांनी सर्व सहभागी महिलांचे पाद्यपूजन (चरण पूजन) करून आदरातिथ्य केले. ठिकठिकाणी फुलांची उधळण करत महिलांचे स्वागत करण्यात आले. स्त्रीशक्तीप्रती व्यक्त केलेला हा सन्मान सर्वांच्या मनाला भावून गेला.


      शोभायात्रेची सांगता श्री एकदंत गणपती मंदिरात करण्यात आली. तेथे महाआरती करून भक्तिभावात कार्यक्रमाची समाप्ती झाली. महिलांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवत आनंद व्यक्त केला. गणेश जयंतीनिमित्त धार्मिकतेला सांस्कृतिक परंपरेची जोड देणारा हा उपक्रम उपस्थित भाविकांच्या विशेष पसंतीस उतरला.

Post a Comment

For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com

أحدث أقدم