Top News

Blood Camp | अल करम हॉस्पिटलच्या वतीने रक्तदान शिबिर संपन्न

 प्रत्येक निरोगी व्यक्तीने वर्षातून एकदा तरी रक्तदान केला पाहिजे - डॉ.जहीर मुजावर

Blood Camp | अल करम हॉस्पिटलच्या वतीने रक्तदान शिबिर संपन्न

 






नगर  : दर्शक । 
 रक्तदान हे सर्वात श्रेष्ठ दान आहे. कारण रक्तामुळेच एखाद्या व्यक्तीचे प्राण वाचू शकतात.अपघात शस्त्रक्रिया गंभीर आजार अशा अनेक प्रसंगी रक्ताची तातडीने गरज भासते. त्या वेळी वेळेवर उपलब्ध झालेले रक्त म्हणजे दुसऱ्याला दिलेले नवे आयुष्य असते. नियमित रक्तदान केल्याने रक्तदात्याचे आरोग्यही चांगले राहते, हे शास्त्राने सिद्ध झाले आहे. 




तुमचा हा छोटासा वाटणारा त्याग कुणासाठी तरी संपूर्ण आयुष्य ठरू शकतो. समाजातील प्रत्येक निरोगी व्यक्तीने वर्षातून किमान एकदा तरी रक्तदान करण्याचा संकल्प केला, तर कोणाच्याही रक्ताअभावी प्राण जाणार नाही, असे प्रतिपादन अल करम हॉस्पिटलचे डॉ.जहीर मुजावर यांनी केले.




भारताच्या प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून अल करम हॉस्पिटल व अल करम सोसायटीच्या वतीने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.




शिबिराचे उद्घाटन डॉ.जहीर मुजावर यांच्या हस्ते झाले. यावेळी डॉ. अशपाक पटेल, डॉ. नाजेमा जहीर, डॉ. जैनब पटेल,शाहीद सय्यद,अर्शद सय्यद, राजीक खान आदी मान्यवर उपस्थित होते. रक्तदान शिबिरात विविध वयोगटातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवून सामाजिक बांधिलकी जपली.



रक्त संकलनासाठी अर्पण ब्लड बँकेचे मोलाचे सहकार्य लाभले. शिबिरात रक्तदान करणाऱ्या सर्व रक्तदात्यांचा व उपस्थित मान्यवरांचा तौफिक तांबोली, शेरअली शेख, एजाज तांबोली आदी मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.



मनोगत व्यक्त करताना शाहीद सय्यद म्हणाले की, समाजाच्या हितासाठी असे उपक्रम राबविणे ही आपली सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे. रक्तदान, आरोग्य शिबिरे व सामाजिक सेवा यामुळे अनेक गरजूंचे जीवन वाचू शकते. प्रत्येक व्यक्ती, संस्था व युवकांनी पुढाकार घेतला तर समाज अधिक सशक्त बनेल असे सांगितले.


हे शिबिर यशस्वी करण्यासाठी अल करम सोसायटी व अल करम हॉस्पिटलच्या सर्व सभासदांनी विशेष परिश्रम घेतले.

Post a Comment

For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com

أحدث أقدم