Shrinath School | श्रीनाथ विद्या मंदिर विद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलन संपन्न
नगर : दर्शक |
वर्षातून एकदा विद्यार्थ्यांच्या मेहनतीचे व यशाचे कौतुक होण्याचा दिवस म्हणजे वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण समारंभ होय. या मंचावरून विद्यार्थ्यांबरोबरच पालकांनाही प्रेरणा मिळते. यश सहज मिळत नाही, त्यासाठी कष्ट, प्रयत्न आणि सातत्य आवश्यक आहे. ही त्रिसूत्री अंगीकारली तरच यशाचे शिखर गाठता येते, असे प्रतिपादन मार्कंडेय माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे माजी प्राचार्य बाळकृष्ण गोटीपामूल यांनी केले.
वसंत टेकडी येथील सेवा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित श्री. नाथ विद्या मंदिर विद्यालयाचा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ व विविध गुणदर्शन कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून माजी प्राचार्य बाळकृष्ण गोटीपामूल उपस्थित होते. अध्यक्षस्थानी कासार पिंपळगाव येथील छत्रपती शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे सेवानिवृत्त प्राचार्य दादासाहेब भोईटे होते. यावेळी माजी प्राचार्या डॉ.रेखा राणी खुराना, प्राचार्य डॉ.श्याम पंगा, डॉ.वेणु कोला, संदीप कांबळे,प्राचार्या अनुराधा चव्हाण, सविता सानप, सुचित्रा डावरे, विजया नवले, मीरा नराल आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी विद्यार्थ्यांनी लिहिलेल्या‘गगन भरारी’ या हस्तलिखिताचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. श्री.गोटीपामुल पुढे म्हणाले की सेवा शिक्षण प्रसारक संस्थेची शैक्षणिक प्रगती हि नावाप्रमाणे सर्वसामान्य पालकांना शिक्षणाची सेवा देत आहे.प्राथमिक शाळेपासून सुरू झालेली ही संस्था आज इंजिनिअरिंग, फार्मसी, आयुर्वेद अशा विविध व्यावसायिक शिक्षण शाखांपर्यंत पोहोचली आहे, ही अभिमानाची बाब आहे. तंत्रज्ञानाच्या युगात स्पर्धा वाढली असून या स्पर्धेत टिकण्यासाठी सतत अपडेट राहणे गरजेचे आहे. मोबाईल व संगणकाचा वापर मनोरंजनापुरता न ठेवता शिक्षण, ज्ञानवृद्धी आणि प्रगतीसाठी करावा. वाचनाची आवड जोपासा. ‘श्यामची आई’ या पुस्तकातून साने गुरुजींनी आईचे महत्त्व आणि संस्कारांचे मोल अधोरेखित केले आहे. शिक्षकांचा व वडीलधाऱ्यांचा सन्मान ठेवा, पर्यावरणाचे रक्षण करा, चांगले मित्र मैत्रिणी निवडा आणि देशाला अभिमान वाटेल असे नागरिक बना, असे आवाहन त्यांनी विद्यार्थ्यांना केले.
अध्यक्षीय भाषणात दादासाहेब भोईटे म्हणाले की, पालकांनी विद्यार्थ्यांना प्रत्येक गोष्ट सहज उपलब्ध करून दिल्यास ते लाडावतात. त्यामुळे पालकांनी काही गोष्टींसाठी ‘नाही’ म्हणण्याची सवय लावली पाहिजे.आमच्या काळात छडी होती आणि त्या शिस्तीतूनच विद्या मिळत होती,असे त्यांनी नमूद केले. विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढवण्यासाठी संस्था सातत्याने प्रयत्नशील असल्याचेही त्यांनी सांगितले.
प्रास्ताविकात मुख्याध्यापिका अनिता सिद्दम यांनी वर्षभर राबविलेल्या विविध शालेय व सहशालेय उपक्रमांचा आढावा घेतला. कार्यक्रमात चिमुकल्यांनी नृत्य, नाट्य व विविध कलागुणांचे सादरीकरण केले. मान्यवरांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांना पारितोषिकांचे वितरण करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वर्षा कबाडी मॅडम यांनी केले तर आभार मीनाक्षी यन्नम यांनी मानले.

إرسال تعليق
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com