Top News

Bhingar | महिलांचे सक्षमीकरण हाच सावित्रीबाईंच्या विचारांचा खरा वारसा – अलकाताई पांढरे

 भिंगारमधील शुक्लेश्वर कॉलनीत सावित्रीबाई फुले जयंती मोठ्या उत्साहात साजरी

Bhingar | महिलांचे सक्षमीकरण हाच सावित्रीबाईंच्या विचारांचा खरा वारसा – अलकाताई पांढरे



नगर : दर्शक । 

नगर – भिंगार शहरातील शुक्लेश्वर कॉलनी येथे सावित्री स्वयं सहाय्यता महिला बचत गट या संघटनेच्या माध्यमातून क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त महिलांच्या वतीने त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेसमोर दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. महिलांनी एकत्र येत सावित्रीबाईंच्या कार्याला अभिवादन करत त्यांचे विचार आत्मसात करण्याचा निर्धार व्यक्त केला.        



  या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अलका पांढरे होत्या. यावेळी अक्षदा फळे, मोहिनी घोडके, शैलाजा गांधले, मनीषा दळवी, अर्चना नरवरे, राधा गायकवाड, मीना गांधले, अनिता गांधले, चंदा फुलारी, मोहिनी घोडके, स्वता रंधे, तृप्ती कटोरी यांच्यासह परिसरातील महिलांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.      



   यावेळी मार्गदर्शन करताना अलकाताई पांढरे म्हणाल्या की, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे जीवनकार्य अत्यंत महान असून त्यांनी अतिशय कठीण परिस्थितीतही मुलींच्या शिक्षणासाठी अविरत संघर्ष केला. समाजाकडून होणारा विरोध, अपमान व संकटांना सामोरे जात त्यांनी शिक्षणाचा दीप तेवत ठेवला. महिलांना व मुलींना शिक्षणाच्या माध्यमातून सक्षम करण्याचा त्यांचा प्रयत्न आजही समाजासाठी प्रेरणादायी आहे.     



  पुढे त्या म्हणाल्या की, महिलांचे सक्षमीकरण म्हणजे केवळ आर्थिक स्वावलंबन नव्हे, तर आत्मविश्वास, निर्णयक्षमता आणि समाजात सन्मानाने उभे राहण्याची संधी मिळणे होय. पाच बचत गटांच्या माध्यमातून महिलांना घराच्या चौकटीबाहेर पडण्यासाठी विविध संधी उपलब्ध करून दिल्या जात असून त्यांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळत आहे. महिलांनी आपल्या आवडीच्या क्षेत्रात करिअर घडवावे, हाच सावित्रीबाई फुले यांच्या विचारांचा खरा वारसा असल्याचे त्यांनी नमूद केले.         



यावेळी शैलाजा गांधले यांनीही महिलांना मार्गदर्शन केले. त्यांनी सांगितले की, महिलांच्या सक्षमीकरणासाठी पाच बचत गटांच्या माध्यमातून विविध सामाजिक व आर्थिक उपक्रम राबविण्यात येत आहेत. बचत गटांच्या माध्यमातून महिलांना रोजगाराच्या संधी मिळाव्यात यासाठी वेगवेगळे कार्यक्रम घेतले जात असून बचत गटांचे स्टॉलही भरविण्यात येत आहेत. यामुळे महिलांना स्वतःची उत्पादने विक्रीस ठेवण्याची संधी मिळत आहे.   



     सावित्री स्वयं सहाय्यता महिला बचत गट, नागरदेवळे यांच्या वतीने यावर्षी प्रथमच महिलांसाठी विविध खेळ व उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये संगीत खुर्ची, उखाणा स्पर्धा तसेच इतर मनोरंजनात्मक खेळ घेण्यात आले. यावेळी महिलांनी सावित्रीबाई फुले यांच्यावर कविता सादर केल्या तसेच त्यांच्या जीवनकार्याविषयी माहिती देणारी भाषणेही झाली. याच कार्यक्रमात बचत गटाची माहिती देत या संघटनेच्या माध्यमातून महिलांच्या आर्थिक, सामाजिक व वैयक्तिक विकासासाठी राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती उपस्थितांना देण्यात आली. पारंपरिक फुगड्या खेळत महिलांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. या उपक्रमांमुळे महिलांमध्ये एकोपा, आनंद व सकारात्मक ऊर्जा निर्माण झाल्याचे दिसून आले. सावित्रीबाई फुले यांचे विचार आत्मसात करून समाजात सकारात्मक बदल घडवण्याचा संकल्प यावेळी उपस्थित महिलांनी केला.

Post a Comment

For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com

أحدث أقدم