Top News

डोंगरगण जि. प. शाळेत 'रामेश्वर विद्यार्थी बचत बँके'चा थाटात शुभारंभ ; विद्यार्थ्यांच्या हाती बँकेची धुरा

 मंगळवारी आणि शुक्रवारी चालणार बँकेचे कामकाज

नगर : दर्शक ।




नगर : दर्शक । 
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, डोंगरगण येथे थोर स्वातंत्र्यसेनानी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीचे औचित्य साधून 'रामेश्वर विद्यार्थी बचत बँके'चा शानदार उद्घाटन सोहळा संपन्न झाला. या बँकेचे कामकाज पूर्णपणे विद्यार्थ्यांमार्फत पाहिले जाणार असून, या अनोख्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.


            कार्यक्रमाचे उद्घाटन व्यंकटेश मल्टी स्टेट सर्व्हिसेसचे झोनल मॅनेजर ज्ञानेश्वर काकडे आणि ग्रामपंचायत सदस्य मेजर सर्जेराव मते यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा कोमल चांदणे आणि उपाध्यक्ष रवींद्र कदम यांची प्रमुख उपस्थिती होती.


            कार्यक्रमाच्या सुरुवातीला नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना अभिवादन करण्यात आले. विद्यार्थी चैतन्य चांदणे याने नेताजींच्या वेशभूषेत हजेरी लावत उपस्थितांचे लक्ष वेधले. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते फित कापून आणि बँकेच्या नामफलकाचे अनावरण करून बचत बँकेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी मान्यवरांनी बँकेत प्रतीकात्मक रक्कम जमा करून आणि विद्यार्थ्यांना खास तयार करण्यात आलेल्या पासबुकांचे वितरण करून प्रत्यक्ष व्यवहाराला सुरुवात केली.


            या बँकेचे कामकाज दर मंगळवारी आणि शुक्रवारी दुपारी दोन ते तीन या वेळेत चालणार असून, सर्व जबाबदारी विद्यार्थी स्वतः सांभाळणार आहेत. कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांनी ज्ञानेश्वर काकडे यांची मुलाखत घेत बँकिंग आणि बचतीचे महत्त्व जाणून घेतले. या मुलाखतीचे प्रास्ताविक कुमारी अनुष्का हिलगुडे हिने केले, तर आभार अथर्व चांदणे याने मानले.

चौकट [ • पहिल्याच दिवशी पाचशे पंचवीस रुपये बँकेत जमा  • ग्रामपंचायत सदस्य व शाळेचे माजी विद्यार्थी सर्जेराव मते यांनी ही काढले बचत बँकेत खाते  • शाळेचे सर्व कामकाज विद्यार्थी स्वतः करणार • बँकेत जमा पैशातून भविष्यात विद्यार्थी वस्तू भांडाराचा शाळेचा मानस ]

            आपल्या मार्गदर्शनात ज्ञानेश्वर काकडे यांनी शाळेच्या या उपक्रमाचे तोंडभरून कौतुक केले. "जिल्हा परिषद शाळा ही विद्यार्थ्यांच्या जीवनाला आकार देणारे ठिकाण आहे. शाळेने आणि पालकांनी आपल्याला खूप काही दिले आहे, त्यामुळे येथूनच उत्तम शिक्षण घेऊन जीवनात यशस्वी व्हा," असा मूलमंत्र त्यांनी विद्यार्थ्यांना दिला, तसेच बँकेसाठी सर्वोतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.


               माजी सैनिक आणि ग्रामपंचायत सदस्य सर्जेराव मते यांनीही या अभिनव उपक्रमाचे स्वागत केले. शाळेचे माजी विद्यार्थी असल्याने आपणही या विद्यार्थी बचत बँकेत खाते उघडून नियमित व्यवहार करणार असल्याचे त्यांनी जाहीर केले.


            कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपक्रमशील शिक्षक ज्ञानेश्वर चेडे यांनी केले. तर भविष्यात शाळेत 'विद्यार्थी वस्तू भांडार' सुरू करण्याचा मानस व्यक्त करत राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त शिक्षक नारायण मंगलारम यांनी उपस्थितांचे आभार मानले.

Post a Comment

For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com

أحدث أقدم