Top News

जिल्ह्यात उद्योगवाढीस चालना देण्यासाठी उद्योगांना मूलभूत सुविधा पुरवा – जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया

 जिल्ह्यात उद्योगवाढीस चालना देण्यासाठी उद्योगांना मूलभूत सुविधा पुरवा – जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया







नगर : दर्शक ।


जिल्ह्यातील औद्योगिक क्षेत्राचा सर्वांगीण विकास साधून अधिकाधिक नवीन उद्योग जिल्ह्यात येण्यासाठी अनुकूल वातावरण निर्माण करण्यात यावे. उद्योगांना आवश्यक असलेल्या वीज, पाणी, रस्ते, भूखंड, बँक कर्ज व इतर मूलभूत सुविधा तत्परतेने उपलब्ध करून द्याव्यात. यामुळे मोठ्या प्रमाणात रोजगारनिर्मिती होईल, या दृष्टीने उद्योगस्नेही वातावरण निर्माण करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी दिले.


जिल्हाधिकारी कार्यालयात 'जिल्हा उद्योग मित्र समिती'च्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते, त्याप्रसंगी जिल्हाधिकारी डॉ. आशिया बोलत होते. या बैठकीस महाव्यवस्थापक दीपक शिवदास, औद्योगिक विकास महामंडळाचे विभागीय अधिकारी गणेश राठोड, उद्योग अधिकारी अशोक बेनके, व्यवस्थापक श्याम बिराजदार, प्रकाश गांधी, अरविंद पारगावकर, हरजितसिंग वाधवा यांच्यासह अशासकीय सदस्य व संबंधित विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.


जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया म्हणाले, औद्योगिक क्षेत्रातील उद्योजकांना आवश्यक त्या सर्व मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात. अहिल्यानगर येथील औद्योगिक क्षेत्रात ट्रक टर्मिनल उभारणीसाठी गतीने कार्यवाही करण्यात यावी. बोल्हेगाव फाटा येथील रस्त्याचे काम गतीने, गुणवत्तापूर्ण व दर्जेदार करण्यात यावे. औद्योगिक क्षेत्राला अखंडितपणे वीजपुरवठा होण्यासाठी स्वतंत्र सबस्टेशन उभारणीच्या कामाला गती देण्यात यावी. यासाठी निधीची आवश्यकता भासत असल्यास जिल्हा नियोजन मंडळाकडे निधीसाठी प्रस्ताव सादर करण्यात यावा. क्षेत्रामध्ये साठणाऱ्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्यात यावी. कचरा वाहतूक करणाऱ्या वाहनांची संख्या कमी पडत आहे, त्यामुळे उद्योगांनी सीएसआरच्या माध्यमातून वाहने उपलब्ध करून देण्याचे आवाहनही जिल्हाधिकारी डॉ. आशिया यांनी केले.


औद्योगिक क्षेत्रातील फीडरची आवश्यकतेप्रमाणे दुरुस्ती करून या भागात अखंडित वीजपुरवठा सुरू राहील, याची दक्षता घ्यावी. तसेच, पाणीपुरवठा सुरळीत राहण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्यात याव्यात. बोल्हेगाव रस्ता दुरुस्ती, सनफार्मा ते निंबळक रस्ता दुरुस्ती याबरोबरीने औद्योगिक क्षेत्रातील उर्वरित अतिक्रमणे तातडीने हटविण्यात यावीत. औद्योगिक क्षेत्रात पोलिसांची गस्त वाढविण्यात यावी. पावसाचे पाणी साठल्याने अनेक उद्योगांचे नुकसान होत आहे, हा प्रश्न प्राधान्याने सोडविण्यात यावा. संगमनेर, नेवासा, श्रीरामपूर येथील औद्योगिक क्षेत्राच्या समस्याही प्राधान्याने सोडविण्याच्या सूचना जिल्हाधिकारी डॉ. आशिया यांनी यावेळी दिल्या.


एकल महिलांना रोजगार देण्याचे आवाहन

जिल्ह्यातील एकल महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनवून त्यांच्या पायावर सक्षमपणे उभे करण्यासाठी प्रशासनाच्या वतीने विविध पातळ्यांवर व्यापक प्रयत्न सुरू आहेत. विविध माध्यमांद्वारे महिलांच्या क्षमतेला दिशा देण्यात येत असून, या प्रयत्नांना उद्योग क्षेत्राची साथ अत्यंत महत्त्वाची आहे. महिलांच्या शैक्षणिक पात्रता, व्यावसायिक कौशल्य व अनुभवाचा विचार करून उद्योगांनी त्यांना त्यांच्या उद्योगांमध्ये रोजगाराच्या संधी उपलब्ध करून द्याव्यात, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी केले. यामुळे महिलांना आत्मनिर्भरतेचा मार्ग खुला होऊन कुटुंबासह जिल्ह्याच्या सामाजिक-आर्थिक विकासाला चालना मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.


यावेळी जिल्ह्यातील औद्योगिक गुंतवणूक वाढ, नवउद्योजकांना प्रोत्साहन, तसेच उद्योगांना भेडसावणाऱ्या अडचणी तातडीने सोडविण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.


Post a Comment

For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com

أحدث أقدم