Top News

सैनिकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ध्वजदिन निधीसाठी मोलाचे योगदान द्या-जिल्हाधिकारी

 सैनिकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ध्वजदिन निधीसाठी मोलाचे योगदान द्या-जिल्हाधिकारी

सैनिकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ध्वजदिन निधीसाठी मोलाचे योगदान द्या-जिल्हाधिकारी




  नगर -  जिल्हास्तरीय ध्वजदिन निधी २०२४ निधी संकलन कार्यक्रमाचा शुभारंभ जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ आणि पद्मश्री पोपटराव पवार  यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात करण्यात आला. देशासाठी सीमेवर लढणाऱ्या सैनिकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकाने ध्वजदिन निधीसाठी मोलाचे योगदान द्यावे, असे आवाहन यावेळी श्री.सालीमठ यांनी केले.


कार्यक्रमाला   महानगरपालिका आयुक्त यशवंत डांगे, उप विभागीय पोलीस अधिकारी संपतराव भोसले , श्री साईबाबा संस्थानचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप भोसले, प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी हिरामण झिरवाळ, कर्नल साहेबराव शेळके (निवृत्त), जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी स्क्वॉड्रन लिडर वि.ल. कोरडे (निवृत्त) आदी उपस्थित होते.



यावेळी बोलताना  जिल्हाधिकारी सालीमठ म्हणाले, जिल्ह्यात सैनिक आणि माजी सैनिकांची साधारण १४ हजार कुटुंबे आहेत. त्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी आणि त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी  ध्वजदिन  निधी संकलन महत्वाचे आहे.  यावर्षी २ कोटी ८० लाखाचे उद्दिष्ट असले तरी ६ कोटीचा निधी संकलित करण्याचे उद्दीष्ट ठेवून प्रत्येकाने यात भरीव योगदान द्यावे.  प्रत्येक अधिकारी - कर्मचाऱ्याने एक दिवसाचा पगार ध्वजदिन निधीसाठी द्यावा, असे आवाहन त्यांनी केले.   जिल्ह्याने गेल्यावर्षी विक्रमी संकलन केल्याबद्दल  जिल्ह्यातील सर्व कार्यालय प्रमुख, अधिकारी,कर्मचारी  आणि नागरिकांना धन्यवाद देत त्यांचे अभिनंदन केले आहे. सैनिकप्रती सद्भावना व्यक्त करण्यासाठी माजी सैनिकांच्या समस्या सोडविण्यासाठी जिल्हा प्रशासन सातत्याने प्रयत्नशील असल्याचेही जिल्हाधिकारी म्हणाले.


पद्मश्री पवार म्हणाले, वीर जवान सीमेवर आणि किसान गावातील शेतात देशासाठी कार्य करतो. या दोघांवर देशाची जबाबदारी आहे. देशासाठी सीमेवर लढताना अनेक बांधवांना वीर मरण येते, तर काहींना कायमचे अपंगत्व येते. अशा सैनिकांच्या कुटुंबियांना मदत करणे हे समाजाचे कर्तव्य आहे. त्यामुळे  जिल्ह्यातून अधिकाधिक निधी संकलित व्हावा यासाठी नागरिकांनी योगदान द्यावे आणि माजी सैनिकांना शक्य असेल तिथे सहकार्य करावे.  पुढील वर्षी जिल्ह्यातील सरपंचांचे ध्वजदिन निधीला भरीव योगदान राहावे यासाठी आपण पुढाकार घेऊ, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली. जिल्ह्यात माजी सैनिक संघटनेच्या माध्यमातून अनेक समाजोपयोगी उपक्रम राबविले जात असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. 


सैनिकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ध्वजदिन निधीसाठी मोलाचे योगदान द्या-जिल्हाधिकारी



प्रास्ताविकात श्री. कोरडे म्हणाले, भारताच्या संरक्षणासाठी ज्यांनी आपले प्राण अर्पण केले अशा जवानांच्या कुटुंबीयांच्या जीवनातील अडीअडचणी दूर करून त्यांचे जीवन सुसह्य होण्यासाठी, युद्धात अपंगत्व तसेच सेवा निवृत्त झालेल्या जवानांच्या पुर्नवसनाकरिता सशस्त्र सेना ध्वज निधी संकलन करण्यात येते. यात लोकसहभागाला महत्व आहे. सैनिकांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आणि नव्या पिढीत राष्ट्र प्रेमाची भावना निर्माण करण्यासाठी हा कार्यक्रम राबविला जातो. यावर्षी ५ कोटी ८ लाख रुपये अर्थात उद्दिष्टाच्या २७५ टक्के निधी संकलन करण्यात आले आणि २ कोटी १८ लाख रुपयांचा निधी माजी सैनिकांच्या कल्याणासाठी वापरण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.


कार्यक्रमाच्या प्रारंभी शहीद जवानांना आदरांजली अर्पण  करण्यात आली. मनोहर नरहरी नातू यांच्यावतीने वीर पत्नी कौसल्या एकनाथ कर्डिले यांना एक लाख रुपयाचा धनादेश मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. श्री.नातू यांनी सलग दहाव्या वर्षी असा निधी दिला आहे. यावेळी माजी सैनिकांच्या मुलांना शैक्षणिक कामगिरीबद्दल विशेष गौरव पुरस्कारांचे वितरणही करण्यात आले.


माजी सैनिक भाऊसाहेब रावजी पवार यांच्यातर्फे देण्यात येणारा १० हजाराचा निधी  वीरपत्नी मिनाबाई भानुदास गायकवाड यांना धनादेशाद्वारे देण्यात आला. ध्वजदिन निधीसाठी १० हजार रुपये योगदान देणाऱ्या श्री रामकृष्ण  क्षीरसागर महाराज आराधना भक्त मंडळ  आणि २ लाख रुपये योगदान देणाऱ्या सन फार्मा प्रा.लि. चा यावेळी  प्रातिनिधीक स्वरुपात सत्कार करण्यात आला. सीजी पॉवर संस्थेतर्फे सामाजिक दायित्व निधीतून सैनिकी मुलींच्या वसतिगृहासाठी २५ लाख रुपयाचे काम केल्याबद्दल संस्थेच्या प्रतिनिधींचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. माजी सैनिकांसाठी कार्य करणाऱ्या अक्षय टेमकर आणि ज्ञानदेव शेळके यांचाही यावेळी सत्कार  करण्यात आला.


कार्यक्रमाला अधिकारी, कर्मचारी, सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी,  माजी सैनिक, माजी सैनिकांचे कुटुंबीय, वीर पत्नी, वीर माता, वीर पिता आदी उपस्थित होते.

Post a Comment

For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com

أحدث أقدم