Ahmednagar News: किल्ल्याच्या विकासासाठी ९५ कोटी निधीस मान्यता : जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ
अहमदनगर | संध्याकाळचे आल्हाददायक व रम्य वातावरणात ऐतिहासिक भुईकोट किल्ला, डौलाने फडकणारा तिरंगा ध्वज व आय लव्ह नगरचा फलकाच्या साक्षीने नगरकरांनी अहमदनगर शहराचा ५३५ वा स्थापना दिवस साजरा केला. येथील रसिक ग्रुपच्या वतीने शहराच्या स्थापना दिनाच्या पूर्वसंध्येला सोमवारी सायंकाळी एका संस्मरणीय मैफलीचे भुईकोट किल्ल्याजवळील आय लव्ह नगर गार्डन येथे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाचे औचित्य साधून जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ यांनी किल्ल्याच्या विकासासाठी ९५ कोटी निधीस मान्यता मिळाल्याची घोषणा करत नगरकरांना अनोखी भेट दिली. यावेळी नयनरम्य निसर्गाच्या सान्निध्यात झालेली सुनहरी शाम.. शहर के नाम..’ ही हिंदी – मराठी बहारदार गीतांची सुरेल मैफल रंगली.
रसिक ग्रुपचे अध्यक्ष जयंत येलुलकर यांच्या संकल्पनेतून आयोजित या अनोख्या कार्यक्रमात नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरिक्षक डॉ. बी. जी.शेखर पाटील यांच्या सेवापूर्ती निमित्त नगरवासीयांच्यावतीने विशेष नागरी सत्कार जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी आमदार संग्राम जगताप, मनापा आयुक्त डॉ. पंकज जावळे,
जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला, मेजर चंद्रशेखर, कोहिनूरच्या संचालिका श्रीमती नीता गांधी, चिंतामण रामचंद्र देशमुख ज्वेलर्सचे संचालक नीळकंठ देशमुख, डॉ.विद्युल्लता शेखर पाटील, पोलीस उपाधीक्षक प्रशांत खैरे यांच्यासह लष्करी, पोलीस अधिकारी, पत्रकार व विविध क्षेत्रातिल नागरिक मोठ्या संख्यने उपस्थित होते. शहराच्या ५३५ व्या स्थापना दिनानिमित्त उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते हवेत फुगे सोडण्यात आले. या कार्यक्रमास चिंतामण रामचंद्र देशमुख ज्वेलर्सचे सहकार्य लाभले. एलसीबीचे पोलीस अधिक्षक दिनेश अहिरे यांचाही सन्मान करण्यात आला.
या कार्यक्रमाचे औचित्य साधत जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ यांनी ऐतिहासिक भुईकोट किल्ल्याच्या विकास प्रकल्पासाठी व पर्यटनाला चालना मिळण्यासाठी ९५ कोटी रुपयांच्या प्रकल्पाला मान्यता मिळाल्याचे सांगितले.
आयुक्त डॉ.पंकज जावळे यांनी नगरकरांनी आपल्या शहराप्रती अभिमान बाळगून शहराच्या विकासासाठी व स्वच्छतेसाठी महापालिकेच्या प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन केले. नीळकंठ देशमुख यांनी शहराच्या रसिक ग्रुपच्या कार्याचे कौतुक करून शहराचा गौरव करणारी स्वलिखित छोटी कविता सादर केली. प्रास्ताविक संयोजक जयंत येलूलकर यांनी केेले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. प्रसाद बेडेकर यांनी केले. सुदर्शन कुलकर्णी यांनी आभार मानले.
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com