क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती ’न्यू आर्ट्स’ मध्ये उत्साहात साजरी
नगर - क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचे शिक्षण कार्य समजून घेताना जोतिराव फुले यांची वैचारिक जडणघडण अगोदर समजून घेतली पाहिजे. शिक्षणाच्या सुविधाच नव्हे तर पोषक वातावरण नसताना देखील त्यांनी सर्वांसाठी शिक्षणाची रुजवात केली.
स्वातंत्र्यपूर्वी समानता पाहिजे आणि ती शिक्षणामुळे येऊ शकते ही भावना त्यामागे होती. त्यांच्या अथक प्रयत्नांमुळे आपण शिक्षण घेत आहोत, मात्र त्याचे ज्ञानात रूपांतर करण्याची गरज आहे. कारण अविदयेने किती अनर्थ होतात हे जोतिराव फुले यांनी आधीच सांगून ठेवले आहे. ज्ञानाचा वसा जोतिरावांनी दिला आणि सावित्रीबाईंनी शिक्षण दिले याची जाणीव ठेवून शिक्षणाला नोकरीचे मापदंड लावण्यापेक्षा ज्ञानाची कास धरा. ज्ञानदान करून एकमेकांचे ऊर्जा स्रोत व्हा, असे प्रतिपादन प्रथम जिल्हा व सत्र न्यायाधीश अंजू शेंडे यांनी केले.
शहरातील न्यू आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स कॉलेजमध्ये दरवर्षीप्रमाणे यंदाही क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. त्यावेळी प्रमुख अतिथी म्हणून न्या. अंजू शेंडे बोलत होत्या. महाविद्यालयात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती निमित्त सर्व प्राध्यापक व विद्यार्थ्यांसाठी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. संस्थेच्या खजिनदार अॅड. दीपलक्ष्मी म्हसे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होत्या. याप्रसंगी प्रमुख पाहुण्या म्हणून न्यायाधीश तथा अहमदनगर जिल्हा विधी प्राधिकरणच्या सचिव भाग्यश्री पाटील उपस्थित होत्या. तसेच अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे अध्यक्ष मा. रामचंद्र दरे, सचिव मा. विश्वासराव आठरे, सहसचिव मा. जयंत वाघ, कार्यकारिणी सदस्य मा. कल्पना वायकर, मा. निमाताई काटे, मा. अलका जंगले, मा. राधाकृष्ण आढाव तसेच मा. प्राचार्य डॉ. बाळासाहेब सागडे, उपप्राचार्य डॉ. अनिल आठरे, कला शाखेचे समन्वयक डॉ. किसन अंबाडे, समन्वयक प्रा. सुषमा दरे आदी उपस्थित होते.
न्या. अंजू शेंडे यांनी सांगितले की, शिक्षण महत्त्वाचे आहे म्हणून आपण शिकून आपल्या परीने व्यक्त व्हायला लागलो. परंतु, स्वतः भोवती कोष तयार करून संकुचित सुद्धा झालो. सावित्रीबाईंनी मी शिकले, मोठी झाले असा तोरा मिरवला असता तर आपण येथे नसतो. शिक्षणातून मिळणार्या ज्ञानाची शक्ती अफाट आहे. आपण ह्या ज्ञान शक्तीचा वापर इतरांसाठी करावा. सावित्रीबाई फुले जयंती व महिला मुक्ती दिनाच्या निमित्ताने कार्यक्रमांतून जनजागृती व्हावी. आपल्यामध्ये नवीन विचार रुजावे, चांगले मत तयार व्हावे आणि त्या मतांचा कुटुंबावर आणि पुढे समाजावर सकारात्मक परिणाम व्हावा, अशी अपेक्षा देखील न्या. अंजू शेंडे यांनी व्यक्त केली.
न्या. भागयश्री पाटील यांनी लहान मुले व महिलांसाठी असणार्या विशेष कायदेविषयक योजनांची माहिती दिली. बालकांच्या हक्कांचा संकोच होऊ नये म्हणून बालस्नेही योजनेअंतर्गत अधिकारमित्र कार्यरत आहेत. तसेच मनोविकलांगांसाठी मनोन्याय योजना राबविण्यात येत आहे. त्याबाबत जास्तीत जास्त जनजागृती करण्याचा व पीडितांचे प्रश्न सोडविण्याचा विधी सेवा प्राधिकरणाचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले.
अध्यक्षीय भाषणात संस्थेच्या खजिनदार अॅड. दीपलक्ष्मी म्हसे यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. महिला व बालकांसाठी आता अस्तित्वात असणार्या कायद्यांचे मूळ फुले यांच्या कार्यात आहे, असे त्या म्हणाल्या. पुढे त्यांनी सांगितले की, स्त्री भ्रूण हत्या बंदी कायदा आता आहे, परंतु स्वातंत्र्यपूर्व काळात फुले यांनी बाल हत्या प्रतिबंधक गृह सुरू करून भ्रूण हत्या रोखण्याचा मार्ग दाखवला. अॅट्रॉसिटी अॅक्ट आता लागू आहे, मात्र अस्पृश्यतेविरोधात आवाज उठवून समानतेची कास धरणारे फुले अग्रणी होते. आजवर अनेक समाजसुधारक व विचारवंतांनी वारंवार सांगून देखील समाजातील मुली- महिलांची परिस्थिती पूर्णपणे बदललेली नाही. मुलगी नको ह्या मानसिकतेतून विकृत घटना घडताना दिसतात. स्त्रियांवर अत्याचार होतात. अशा परिस्थितीत सावित्रीच्या लेकींनी फक्त शिक्षणावर न थांबता सावित्रीबाईसारखे धैर्य अंगी बाणले पाहिजे, आणि पुरुषांनी जोतिराव झाले पाहिजे.
अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे अध्यक्ष रामचंद्र दरे यांनी संस्थेची सर्व शाळा व महाविद्यालये ग्रामीण भागांतील विद्यार्थ्यांना, विशेषतः मुलींना शिक्षण देण्यासाठी कटिबद्ध आहेत असे सांगितले. सचिव अॅड. विश्वासराव आठरे यांनी मनोगत व्यक्त करताना संस्थेचा इतिहास कथन सांगून चौथे छत्रपती शिवाजी महाराज तसेच राजर्षी शाहू महाराज यांच्या योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. तसेच ग्रामीण भागांतील मुला-मुलींना शालेय व उच्च शिक्षणाच्या संधी देऊन एक प्रकारे फुले दाम्पत्याचे काम आम्ही पुढे नेत आहोत, अशी भावना देखील व्यक्त केली.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. बी. सागडे यांनी आपल्या मनोगतामध्ये महाविद्यालयाच्या यशस्वी वाटचालीची सविस्तर माहिती दिली. तसेच महाविद्यालय राबवत असलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली.
दरम्यान ’क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचे जीवन व कार्य’ या विषयावरील वक्तृत्व स्पर्धेचे पारितोषिक वितरण झाले. मान्यवरांच्या हस्ते प्रथम पारितोषिक महेश जनार्दन उशीर यास देण्यात आले. गौरी शहाजी गदादे व धनश्री बाळासाहेब खराडे यांना अनुक्रमे द्वितीय व तृतीय पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. उत्तेजनार्थ पारितोषिक सायली अरविंद माहेश्वरी हिला मिळाले. दरवर्षी विविध क्षेत्रांत प्राविण्य मिळवणार्या विद्यार्थिनींना क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले पुरस्काराने सन्मानित केले जाते. यंदा संगीत विशारद झाल्याबद्दल संगीत विभागातील आसावरी संजय पंचमुख, विज्ञान आविष्कार स्पर्धेतील यशाबद्दल ऋतुजा विठ्ठल सावंत, तसेच ऑल इंडिया थल सेना कॅम्प, दिल्ली येथे सहभागी झाल्याबद्दल साक्षी दिनेश बोगा या विद्यार्थिनी पुरस्काराच्या मानकरी ठरल्या.
कार्यक्रमाचे प्रास्तविक प्रा. एस. बी. दरे यांनी केले तर प्रा. एस. एम. मोटे यांनी प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला. तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. दीपाली जगदाळे यांनी केले आणि प्रा. संगीता निंबाळकर यांनी आभार मानले. याप्रसंगी मोठ्या संख्येने प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते.
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com