निर्मलनगरला तुलसी रामायण कथा ज्ञानयज्ञ सोहळा संपन्न
अहमदनगर - महाराष्ट्राला किर्तनाची समृद्ध परंपरा आहे. संतांच्या अभंगावर मनापासून प्रेम करणार्या संप्रदायाला वारकरी संप्रदाय असे म्हणतात. सप्ताहात सात दिवस किर्तन सोहळा झाला, पण काल्याचे किर्तनच केले नाही तर तो सप्ताह पूर्ण होत नसतो. काल्याचे किर्तनाने सप्ताहाला पुर्णत्व प्राप्त होत असते. त्याचप्रमाणे ऐकणार्यांच्या जीवनाला सुद्धा पुर्णत्व प्राप्त होत असते, असे या काल्याचे सामर्थ्य आहे. तेव्हा सप्ताहात काला हा झालाच पाहिजे, असे निरुपण वृंदावनधाम रेलगाव येथील हभप रामायणाचार्य समाधान महाराज यांनी केले.
निर्मलनगर येथील श्री दत्त मंदिरात श्री तुलसी रामायण कथा ज्ञानयज्ञ सोहळा मोठ्या भक्तीमय वातावरणात पार पडला. सप्ताहाची सांगता काल्याच्या किर्तनाने हंडी फोडून करण्यात आली. यावेळी हभप समाधान महाराज, संतोष महाराज पंडित, बाळू महाराज पवार, साई महाराज आदिंसह भाविक उपस्थित होते.
हभप समाधान महाराज यांनी काल्याचे किर्तनाचे महत्व विषद करुन किर्तन महाराष्ट्रीय संस्कृतीचा अमुल्य ठेवा आहे. ज्ञानेश्वरांच्या नवव्या आध्यायाच्या श्लोकावर किर्तनाचे महत्व संत ज्ञानेश्वरांनी सिद्ध केले आहे. भक्तांना भवसागरातून मोक्ष मिळण्यासाठी तुलसी रामायणाचे महात्म्य त्यांनी सांगितले.
निर्मलनगर ग्रामस्थ व भजनी मंडळाने आयोजित केलेल्या या कथा सोहळ्यात रामायणाचार्य समाधान महाराज यांनी विवेचन केले. रोज रात्री 8 ते 11 कथा ऐकण्यासाठी पंचक्रोशितून भाविक मोठ्या संख्येने उपस्थित असत. तर सकाळी 8 ते 11 हभप विद्याताई हारदे यांनी ज्ञानेश्वरी पारायण सात दिवस केले. पहाटे 5 ते 7 काकडा, 7 ते 8 विष्णू सहस्त्रनाम, सायं. 5 ते 6 हरिपाठ असे दैनंदिन कार्यक्रम पार पडले.
कथा सोहळ्यात मंगलाचरण ग्रंथमहात्म्य, वंदना प्रकरण, शिव-पार्वती विवाह, श्रीराम जन्मोत्सव, बाललिला, अहिल्या उद्धार, श्रीराम-जानकी विवाह, वन गमन, केवट भेट, चित्रकूट निवास, भरत भेट, सिता हरण, सिता शोध, रावण वध, राम राज्यभिषेक असे प्रसंग समाधान महाराज यांनी सविस्तरपणे सप्ताहात रसाळ वाणीतून निरुपण केले.
सप्ताहाची सांगता ग्रंथ मिरवणूक, काल्याचे किर्तन व महाप्रसादाने मोठ्या उत्साहात करण्यात आली. या सप्ताह कार्यक्रमासाठी कोणाचाही नामोल्लेख न करता सर्वांनी एकत्रित येऊन अहंकार बाजूला ठेवून मी पणा न दाखतवता समस्त ग्रामस्थांनी सहकार्य करुन परिश्रम घेऊन सप्ताह यशस्वीपणे पार पाडला.
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com