वकिलांवर हल्ला हा न्यायव्यवस्थेवर हल्ला ; पवार, थोरात, सुळे यांचे काँग्रेस लक्ष वेधणार
अहमदनगर (प्रतिनिधी) : ॲड. अशोक कोल्हे यांच्यावरिल हल्ल्याची घटना दुर्दैवी आहे. काही दिवसांपूर्वी राहुरीत वकील दांपत्यांचा निर्घृण खून झाला होता. त्यानंतर अनेक दिवस नगर शहरासह जिल्ह्यात वकिलांनी मोठे आंदोलन छेडले होते. राज्य सरकारकडे वकील संरक्षणाच्या संदर्भातला कायदा पारित करण्याची मागणी काँग्रेसने वकिलांच्या आंदोलनाला पाठिंबा देत केली होती. मात्र सरकारने त्याची दखल घेतली नाही. त्यामुळेच हल्ला करणाऱ्यांचे धाडस वाढले आहे.
पक्षकारानेच ॲड. कोल्हे यांच्यावर हल्ला केल्याचे समोर आले आहे. हा हल्ला केवळ ॲड. कोल्हे यांच्यावर नसून हा न्याय व्यवस्थेवरील हल्ला आहे. याचा आम्ही काँग्रेसच्या वतीने तीव्र निषेध करीत आहोत. नगर शहरामध्ये सध्या गुंडाराज फोफावले आहे. पोलिसांनी याचा खात्मा करण्यासाठी विशेष मोहिम हाती घेण्याची जाहीर मागणी शहर काँग्रेसच्या वतीने जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी केली आहे.
किरण काळे म्हणाले, शहरात होणारे खून, व्यापारी, उद्योजक, सर्वसामान्य नागरिकांच्या प्लॉटवर होणारी ताबेमारी, अवैध धंदे, वकील, डॉक्टर यांच्यावर सातत्याने होणारे हल्ले, शहरातील तरुणांच्या वेगवेगळ्या गटांमध्ये होणाऱ्या मारामाऱ्या, यामध्ये बंदुकी, कट्टे तलवारी, कोयते यांचा होणारा वापर यामुळे पोलिसांचा धाक शहरात उरला आहे की नाही असा प्रश्न निर्माण होत आहे. शहरामध्ये अनेक छोट्या मोठया गॅंग अलीकडील काळात तयार झाल्याचे पाहायला मिळत आहे. या गॅंग्सला राजकीय वरदहस्त दिला जात आहे. अवैध धंद्यांचा सुळसुळाट झाला आहे. सध्या लोकसभा निवडणूक सुरू आहे. अशा काळात वातावरण कलुशीत झाल्यास याचा निवडणुकीवर परिणाम होऊ शकतो.
काळे पुढे म्हणाले की, केवळ निवडणुका आल्या म्हणून नव्हे तर वर्षाचे ३६५ दिवस २४ तास शहरातील प्रत्येक घटकाला सुरक्षित वाटावे असे भयमुक्त वातावरण असले पाहिजे. संपूर्ण संरक्षण आणि भयमुक्त नगर हा काँग्रेसचा नारा आहे. स्व. अनिलभैय्या राठोड असताना यासाठी त्यांनी कायम संघर्ष केला. पोलीस जर त्यांची भूमिका ठोसपणे बजावणार नसतील तर काँग्रेस कार्यकर्ते रस्त्यावर उतरून आक्रमक भूमिका घेतील. नगरकरांच्या सुरक्षेकडे काँग्रेस अत्यंत गांभीर्यपूर्वक पाहत आहे. पोलीस प्रशासनाने देखील हा विषय गांभीर्याने घ्यावा. आजही शहरात अनेक गुन्हेगार मोकाटपणे फिरत आहेत. त्यांच्या मुसक्या आवळण्या साठी प्रस्ताव पोलीस प्रशासनाने तयार करावेत. एमपीडी, मोक्का, तडीपारीच्या कारवाया कराव्यात. अशा प्रकारचे हल्ले काँग्रेस खपवून घेणार नसल्याचा इशारा किरण काळे यांनी दिला आहे.
नगरकरांना ३६५ दिवस संपूर्ण संरक्षण देण्यासाठी काँग्रेस कटीबद्ध आहे. शहरात कोणी दहशत करत असेल, नागरिकांना त्रास, धमक्या देत असतील, पोलिसांचा प्रतिसाद मिळत नसेल तर नागरिकांनी काँग्रेसच्या हेल्पलाईन क्रमांक ९०२८७२५३६८ वर थेट संपर्क साधावा. किरण काळे यांच्या नेतृत्वाखाली नगरकरांना सर्वतोपरी मदत करण्याचे काम काँग्रेस करेल असे ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष मनोज गुंदेचा यांनी नगरकरांना आवाहन करताना म्हटले आहे.
वरिष्ठ नेत्यांचे लक्ष वेधणार :
दरम्यान, पुढील दोन दिवसात ज्येष्ठ नेते शरद पवार, माजी मंत्री आ. बाळासाहेब थोरात, खा. सुप्रियाताई सुळे नगर शहरात येणार आहेत. यावेळी काँग्रेस त्यांच्यासमोर वकिलांच्या संरक्षणासह शहरातल्या गुंडगिरी, दहशतीचा विषय किरण काळे यांच्या नेतृत्वाखाली मांडून त्यांचे लक्ष वेधणार असल्याची माहिती काँग्रेस कामगार आघाडी जिल्हाध्यक्ष विलास उबाळे, अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष अनिस चूडीवाला यांनी दिली आहे.
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com