फिनिक्स सोशल फाऊंडेशनचा सामाजिक उपक्रम
अहमदनगर (प्रतिनिधी)- छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त फिनिक्स सोशल फाऊंडेशनच्या वतीने नेत्रदान व अवयवदानची जनजागृती करण्यात आली. पुणे येथे मोतीबिंदू शस्त्रक्रिया होऊन शहरात परतलेल्या ज्येष्ठ नागरिकांना फिनिक्सचे संस्थापक अध्यक्ष जालिंदर बोरुडे यांनी संकल्प अर्जाचे वाटप करुन नेत्रदान व अवयवदानचे आवाहन केले.
प्रारंभी जुने बस स्थानक येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन करुन छत्रपती संभाजी महाराजांच्या प्रतिमेस अभिवादन करण्यात आले. मोफत नेत्र तपासणी व मोतिबिंदू शस्त्रक्रिया शिबिरातील गरजूंवर के.के. आय बुधराणी येथे शस्त्रक्रिया करण्यात आली. नुकतेच शस्त्रक्रिया झालेले नागरिक शहरात परतले असताना त्यांच्या उपस्थितीमध्ये हा उपक्रम राबविण्यात आला.
जालिंदर बोरुडे म्हणाले की, संभाजी महाराजांनी स्वराज्याच्या रक्षणासाठी आपले रक्त सांडले. या युगपुरुषाला आगळ्या-वेगळ्य पध्दतीने अभिवादन करण्यासाठी नेत्रदान व अवयवदानाची जागृती करण्यात आली. महापुरुषांनी समाजातील उपेक्षित घटकांच्या कल्याणासाठी जीवन वेचले. त्यांचा आदर्श समोर ठेऊन नेत्रदान संकल्प फॉर्म भरून नव्हे, तर प्रत्यक्ष मृत्यूनंतर जवळच्या नेत्रदान व अवयवदान केल्यास खऱ्या अर्थाने महापुरुषांना अभिवादन ठरणार आहे. समाजात नेत्रदान व अवयवदानाची जागृती होण्याची गरज असल्याचे सांगितले.
निसर्गाने दिलेली अनमोल ठेव म्हणजे डोळा असून, डोळ्याने जीवनाचा खरा आनंद घेता येतो. रोज मरणाऱ्या एका व्यक्तीचे डोळे दान केल्यास जवळपास सर्वच अंध व्यक्तींना दृष्टी प्राप्त होणार आहे. त्याचप्रमाणे अवयवदानाद्वारे अनेक गरजूंना नवजीवन जगता येणार असल्याचे फिनिक्सच्या वतीने स्पष्ट करण्यात आले. बोरुडे यांनी यावेळी नेत्रदान व अवयवदानाचे संकल्प अर्ज भरुन घेतले.
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com