निसर्गाला काही देणं आहे या भावनेतून प्रत्यक्ष काम केलं पाहिजे - पोलीस उपनिरीक्षक अनिल अलवाल
अहमदनगर (प्रतिनिधी) - पर्यावरण संरक्षण म्हणजे आपल्या आजूबाजूच्या नैसर्गिक वातावरणाचे प्रदूषण, जंगलतोड, हवामान बदल यासारख्या धोक्यांपासून संरक्षण करणे, केवळ एवढेच नसून त्यासोबतच प्रजातींचे संरक्षण करण्यासाठी आणि संसाधनांचे टिकाऊ वापर सुनिश्चित करण्यासाठी नियम आणि कायदे तयार करणे आणि त्यांचे पालन करणे गरजेचे आहे. प्राण्यांसाठी पाणपोईची व्यवस्था करणे ही केवळ आजच्या गरजेची गोष्ट नसून भविष्यातील पिढ्यांसाठी एक टिकाऊ जग तयार करण्याची जबाबदारी आहे.त्यासाठी निसर्गाला काही देणं आहे या भावनेतून प्रत्यक्ष काम केलं पाहिजे, असे प्रतिपादन पोलीस उपनिरीक्षक अनिल अलवाल यांनी केले.
कडक उन्हाळ्यामुळे मुक्या जनावरांना पिण्यासाठी पाणी मिळत नाही, त्यामुळे पद्मशाली सोशल फाउंडेशन ट्रस्टच्या वतीने शहरात मोकाट फिरणाऱ्या गायी आणि इतर मुक्या जनावरांना पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी म्हणून शहरातील काही भागात पाण्याचे कुंडी ठेवण्यात आले. या सामाजिक उपक्रमाचा शुभारंभ श्री मार्कंडेय मंदिर, गांधी मैदान येथे पोलीस उपनिरीक्षक अनिल अलवाल यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी फाउंडेशनचे अध्यक्ष गणेश लकशेट्टी, रोहित गुंडू, अमोल गाजेंगी, सौरभ कोंडा, कुमार आडेप, अमित सुंकी, संतोष गुंडू, इंजि.अक्षय बल्लाळ, शुभम सुंकी, श्रीनिवास बुरगुल, मयुर जिंदम आदी उपस्थित होते.
पुढे बोलताना अलवाल म्हणाले की, समाजामध्ये निर्माण होणाऱ्या प्रश्नांचे जाण ठेवून पद्मशाली सोशल फाउंडेशन सामाजिक उपक्रम राबवत असते. आज गरजू व्यक्तीबरोबरच पशुपक्षी, प्राण्यांचे हे विचार करून जो सामाजिक उपक्रम राबवला तो खरोखरच कौतुकास्पद असल्याचे ते म्हणाले.
प्रास्ताविकात फाउंडेशनचे अध्यक्ष गणेश लकशेट्टी म्हणाले की, वातावरणातील तापमानात वाढ होत आहे. या उष्णतेत जनावरांच्या आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. मुक्या, मोकाट जनावरांना मुबलक पाणी मिळत नाही. पाण्याविना जनावरे अशक्त होतात, त्यांचा जीव कासावीस होतो, अशा जनावरांची काळजी घेणे तितकेच महत्त्वाचे आहे. या उद्देशानेच पद्मशाली सोशल फाउंडेशन च्या वतीने नगर शहरात विविध १० ठिकाणी पाण्याचे कुंडी ठेवून त्यामध्ये रोज पाणी ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे मुक्या जनावरांना मुबलक पाणी मिळेल, असे सांगून पांडुरंग कोंडा यांना उपचारासाठी पाच हजार रुपये व किराणा साहित्य तसेच सौ.उज्वला मामड्याल यांना खुब्याच्या ऑपरेशन साठी दहा हजार रुपये देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
हे पाण्याचे कुंडी श्री मार्कंडेय मंदिर, गांधी मैदान , तोफखाना, श्रमिक नगर, दातरंगे मळा, शिवाजीनगर, नवरंग व्यायाम शाळा, साई राम सोसायटी, गौरी घुमट या भागात ठेवण्यात आले आहेत. त्यामध्ये रोज ज्या ज्या ठिकाणी हे कुंड ठेवण्यात आलेले आहेत, तेथील श्री मार्कंडेय मंदिर देवस्थान, श्री एकदंत गणेश मंदिर, नवरंग व्यायाम शाळा, गौरीशंकर मित्र मंडळ, सूर्यमुखी गुरुदत्त युवा विकास प्रतिष्ठान, तोफखाना मित्र मंडळ, श्रमिक बालाजी मंदिर, दक्षिणमुखी हनुमान मित्र मंडळ, अष्टविनायक मित्र मंडळ या मंडळाचे कार्यकर्ते त्यामध्ये रोज स्वच्छ पाणी ठेवणार आहेत.
कार्यक्रमास फाउंडेशनचे वरद लकशेट्टी, प्रणव झावरे, दीपक मुदिगोंडा, श्रीनिवास कोडम, रोहन येनगंदुल, अमर सदुल, राहुल नराल, साईनाथ कोल्पेक, रोहित गुडा, शुभम कारमपुरी आदी कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इंजि. अक्षय बल्लाळ यांनी केले तर आभार मयुर जिंदम यांनी मानले.
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com