Urdu | उर्दू ही प्रेम वृद्धिंगत करणारी भाषा - युनूस तांबटकर
नगर : दर्शक । उर्दू ही आपल्या मनाचं प्रतिबिंब व्यक्त करणारी भाषा आहे. मने जोडून प्रेम वृद्धिंगत करणारी ही भाषा सर्व भारतीयांचा मानबिंदू आहे.भाषेच्या प्रगतीसाठी सर्वांनी झटून प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे. विशेषता उर्दू भाषिक शिक्षण संस्था मधून उर्दू भाषा प्रगतीकडे जास्त लक्ष देण्याची गरज आहे. अहमदनगर जिल्हा उर्दू साहित्य परिषदेचे कार्य प्रशंसनिय आहे.
सलग 19 वर्षे उर्दू सप्ताह साजरा करणे सोपी गोष्ट नाही. जिल्हा उर्दू साहित्य परिषद सातत्याने भाषेच्या प्रगतीसाठी प्रयत्नशील आहे ही अभिमानाची बाब आहे. असे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्ते व रहेमत सुलतान फाउंडेशनचे अध्यक्ष युनूसभाई तांबटकर यांनी केले.
अहमदनगर जिल्हा उर्दू साहित्य परिषदेच्या वतीने आयोजित उर्दू सप्ताह समारंभात ते अध्यक्षिय भाषणात प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. यावेळी उर्दू साहित्य परिषदेचे जिल्हाध्यक्ष सलीमखान पठाण, उपाध्यक्ष के के खान, इमाम सय्यद, सचिव आबिद दूल्हे खान, सहसचिव डॉ.कमर सुरूर, सदस्या नर्गिस इनामदार, अनीस शेख, मुन्नवर हुसेन आदि उपस्थित होते.
तांबटकर पुढे म्हणाले की उर्दू भाषेने देशाच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये मोलाचे योगदान दिलेले आहे. आज आपल्या देशात ही भाषा परकिय म्हणून गणली जात आहे ही दुर्दैवी बाब आहे. उर्दू माध्यमातून शिक्षणाच्या उच्च सुविधा उपलब्ध आहेत. त्याचा समाजातील विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी केले.
प्रास्ताविक भाषणात उर्दू साहित्य परिषदेचे जिल्हाध्यक्ष सलीमखान पठाण यांनी उर्दू सप्ताह मागची भूमिका विशद केली. गेली 19 वर्षे देशांमध्ये उर्दू सप्ताह साजरा करणारा अहमदनगर हा एकमेव जिल्हा आहे असे सांगून या उर्दू सप्ताह मध्ये जिल्ह्यातील साडेचार हजार विद्यार्थ्यांनी सक्रिय सहभाग घेतला,त्या सर्वांना प्रशस्तीपत्रे उर्दू साहित्य परिषदे मार्फत देण्यात आली आहेत. तसेच जिल्ह्यातील सप्ताहात सहभागी सर्व शिक्षक मुख्याध्यापक यांना सन्मानचिन्ह देखील देण्यात आले आहे असे ते म्हणाले.
याप्रसंगी डॉ.कमर सुरूर,प्र. मुख्याध्यापक मुनव्वर हुसेन यांनीही मनोगत व्यक्त केले.उर्दू साहित्य परिषदे तर्फे जिल्ह्यातील सर्व शाळांना उर्दू भाषेतील बोर्ड यावेळी प्रदान करण्यात आले. यासाठी उपाध्यक्ष के के खान यांचे मोलाचे सहकार्य मिळाले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सय्यद इमाम व फैयाज शेख यांनी केले. आभार आबिद खान यांनी मानले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बदर शेख आणि शेख साजिद कुरेशी, जुनेद, हनीफ शेख, नर्गीस इनामदार, समीना शेख, शाकीर शेख, सलीम शेख आदींनी परिश्रम घेतले. याप्रसंगी सर्व शिक्षकांना सन्मानचिन्ह,विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्र तसेच शाळांना बोर्ड वाटप करण्यात आले.
x

0 टिप्पण्या
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com