शांतिनिकेतन कॉलेज ऑफ फार्मसीच्या विद्यार्थ्यांचा शैक्षणिक व सामाजिक अभ्यास दौरा
नगर : दर्शक ।
शांतिनिकेतन कॉलेज ऑफ फार्मसी,धोत्रे येथील प्रथम वर्ष बी. फार्मसी व डी. फार्मसीच्या विद्यार्थ्यांसाठी दि. २ जानेवारीला शैक्षणिक व सामाजिक जाणीव वाढविण्याच्या उद्देशाने अभ्यास दौऱ्याचे आयोजन केले होते. या दौऱ्याअंतर्गत विद्यार्थ्यांनी औषधी व सुगंधी वनस्पती प्रकल्प, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी तसेच माऊली सेवा प्रतिष्ठान, मनगाव – घर आणि मन हरवलेल्या माणसांचे गाव, मु. पो. शिंगवे नाईक येथे भेट दिली.
विद्यार्थ्यांनी महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी येथील औषधी व सुगंधी वनस्पती प्रकल्पात विविध औषधी वनस्पतींची लागवड, संवर्धन, प्रक्रिया व औषध निर्मितीतील उपयोग याविषयी तज्ज्ञांकडून सखोल माहिती घेतली. फार्मसी शिक्षणाशी संबंधित प्रत्यक्ष ज्ञान मिळाल्याने विद्यार्थ्यांचा अभ्यास अधिक समृद्ध झाला.
यानंतर विद्यार्थ्यांनी माऊली सेवा प्रतिष्ठान मनगाव येथे विद्यार्थ्यांनी समाजातील दुर्लक्षित घटकांबाबत माहिती घेतली. मानसिक व सामाजिक आधार हरवलेल्या व्यक्तींच्या पुनर्वसनासाठी सुरू असलेल्या उपक्रमांची प्रत्यक्ष पाहणी करताना विद्यार्थ्यांना सामाजिक भान व माणुसकीचे महत्त्व अधोरेखित झाले.
येथील सेवाभावी कार्य, व्यवस्थापन पद्धती व पुनर्वसन प्रक्रिया याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. या फील्ड व्हिजिटमुळे विद्यार्थ्यांना सामाजिक जबाबदारीची जाणीव तसेच औषधी वनस्पतींच्या शास्त्रीय उपयोगा बाबत प्रत्यक्ष अनुभव मिळाला. सदर अभ्यास दौरा कॉलेजचे अध्यक्ष डॉ. प्रशांत शिंदे तसेच प्राध्यापक कांचन जाधव आणि शिवकन्या वणवे या शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली यशस्विरीत्या पार पडला. या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

टिप्पणी पोस्ट करा
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com