Top News

Patrakar Din 2026 | समाजाला दिशा देण्यात पत्रकारांचे मोठे योगदान : आयुक्त यशवंत डांगे

  अहिल्यानगर पत्रकार संघातर्फे पत्रकारांचा सन्मान 

Patrakar Din 2026 | समाजाला दिशा देण्यात पत्रकारांचे मोठे योगदान : आयुक्त यशवंत डांगे


नगर : दर्शक 

 पत्रकारिता हाच लोकशाहीचा कणा आहे. पत्रकारितेकडे एखाद्या संस्थेतील नोकरी म्हणून न पाहता समाजसेवा म्हणून पाहिले पाहिजे. समाजाला दिशा देण्यात पत्रकारांचे मोठे योगदान आहे, असे प्रतिपादन अहिल्यानगर महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी केले. 


आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित मराठी पत्रकाराच्या कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष सुभाष गुंदेचा होते. यावेळी व्यासपीठावर दै. सार्वमतचे संपादक अनंत पाटील, अहमदनगर पत्रकार संघाचे अध्यक्ष अनिल लगड, सचिव संदीप रोडे, ज्येष्ठ पत्रकार रियाज शेख, अशोक झोटिंग, कैलास ढोले आदी उपस्थित होते.

आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करीत दीप प्रज्वलन करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. 

आयुक्त यशवंत डांगे म्हणाले की, आपल्या सभोवताली घडणाऱ्या वेगवेगळ्या घटना आणि त्याची इन्तभूत माहिती समाजापर्यंत पोहोचविण्याचे काम पत्रकार करतात. पत्रकारिता हा सत्याचा धर्म आहे. तो सत्याचा धर्म जागविण्यासाठी पत्रकार धडपड करीत असतो. पत्रकारितेकडे नोकरी म्हणून पाहता समाजसेवेचे माध्यम म्हणून पाहणे गरजेचे आहे. लेखणीला नेहमीच सत्याची धार असली पाहिजे. आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात वेगवेगळ्या माध्यमातून बातमीदारी केली जाते परंतु, त्यामध्ये विश्वासार्हता टिकवणे तितकेच गरजेचे आहे. त्यासाठी पत्रकारांनी लेखणीकडे लक्ष देणे गरजेचे आहे. 



महापालिका पत्रकारांच्या विविध उपक्रमासाठी नेहमीच सहकार्य करीत असते. यापुढेही महापालिका सहकार्य करेल, अशी ग्वाही आयुक्त यशवंत डांगे यांनी दिली.


आनंद पाटील म्हणाले की, माहिती व तंत्रज्ञानाच्या युगामध्ये पत्रकारितेचे स्वरूप बदलत आहे. तरीपण पत्रकारांनी आपल्या लेखणीतील ताकद त्यामधून वारंवार सिद्ध केली पाहिजे. लेखणीमध्ये नावीन्यता असणे गरजेचे आहे.


अध्यक्षीय भाषणामध्ये सुभाष गुंदेचा म्हणाले की, पूर्वी मोजकीच वर्तमानपत्र होते. त्यामुळे पत्रकारांची संख्याही कमी होती, परंतु आज पत्रकारितेत वेगवेगळी माध्यम निर्माण झाली असून पत्रकारांची संख्या वाढली आहे. पत्रकारांचा समाजामध्ये दरारा निर्माण करायचा असेल तर आपली एकजूट असणे आवश्यक आहे. आपण एकत्र राहिलो तरच आपल्या पत्रकारितेला धार राहील. यावेळी विविध वर्तमानपत्राचे बातमीदार, उपसंपादक यांच्यासह पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रास्ताविक अहिल्यानगर पत्रकार संघाचे सचिव संदीप रोडे यांनी केले. लोकमतचे मुख्य उपसंपादक सुदाम देशमुख यांनी आभार मानले. सूत्रसंचालन डॉ. सूर्यकांत वरकड यांनी केले.

Post a Comment

For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com

थोडे नवीन जरा जुने