जागतिक मातृदिनाची ज्येष्ठ मातांना मिळाली दृष्टीभेट
(Photo Rutuja Ahmednagar)अहमदनगर (प्रतिनिधी) - ‘स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी’ असे म्हटले जाते. आपल्या भारतीय संस्कृतीत मातृसेवेला फार महत्व आहे. जनसामान्यांची सेवा करण्याचा वसा घेऊन फिनिक्स फौंडेशनच्या माध्यमातून विविध आरोग्य शिबीराच्या माध्यमातून सर्वसामान्यांना दिलास देण्याचे काम सुरु आहे.
मातृ दिनाचे औचित्य साधून मोफत नेत्रतपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीरात अनेक मातांची तपासणी करुन यशस्वी शस्त्रक्रिया झाल्याने त्यांना दृष्टी देण्याचे काम केले आहे. त्यांना मिळालेली दृष्टी ही मातृदिनाची भेट असल्याचे सांगून त्यांचे आशिर्वाद हेच आमच्या कार्याचे फलित असल्याचे प्रतिपादन फिनिक्स फौंडेशनचे अध्यक्ष जालिंदर बोरुडे यांनी केले.
जागतिक मातृदिनानिमित्त फिनिक्स फौंडेशनच्यावतीने मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीरात यशस्वी शस्त्रक्रिया झालेल्या रुग्ण नगरमध्ये आल्यावर फौंडेशनचे अध्यक्ष जालिंदर बोरुडे यांनी स्वागत केले. याप्रसंगी बाबासाहेब धिवर, मोहन ठोंबे, प्रतिक धिवर आदि उपस्थित होते.
यावेळी कल्पनाबाई जाधव म्हणाल्या, गेल्या काही दिवसांपासून डोळ्यांनी कमी दिसत होते, तपासणी केली असता, मोतीबिंदू झाल्याचे निदान झाले. परंतु मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी मोठा खर्च असल्याने मला नागरदेवळे येथील फिनिक्स फौडेशनच्या मोफत नेत्रतपासणी शिबीरात तपासणी करुन मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी निवड होऊन पुणे येथे बुधराणी हॉस्पिटलमध्ये यशस्वी शस्त्रक्रिया झाली.
अतिशय काळजीपूर्वक सर्व सोयी-सुविधा देत ही प्रक्रिया पार पडली. त्यांच्यामुळे मला पुन्हा दृष्टीप्राप्त झाली, याचा मोठा आनंद आहे. देवदूताच्या रुपाने जालिंदर बोरुडे आमच्या पाठिशी उभे राहिले. खर्या अर्थाने त्यांनी मुलाचे कर्तव्य पार पाडले, अशी भावनिक प्रतिक्रिया व्यक्त केली.
यावेळी सुभद्राबाई रेपाळे म्हणाल्या, डोळ्यानी दिसणे कमी झाल्याने अनेक अडचणी येत होत्या. नागरदेवळे येथील मोफत शिबीरात तपासणी केल्यानंतर मोतीबिंदू शस्त्रक्रियाही झाल्याने पुन्हा चांगल्याप्रकारे दिसू लागले आहे. त्यामुळे मोठा खर्चही वाचला व दिसू लागल्याचा मोठा आनंद आहे. पुढील काळात ज्यांना कोणाला दृष्टीदोष असेल त्यांनाही या शिबीराविषयी माहिती देऊन त्यांनाही दृष्टी देण्याच्या कार्यात सहभागी होवू असे सांगितले.
याप्रसंगी बाबासाहेब धिवर यांनी या फिनिक्स फौंडेशनने राबविलेल्या मोफत नेत्रतपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रियेविषयी माहिती दिली. यावेळी रुग्णांना अल्पदरात चष्मे वाटप करण्यात आले. दृष्टी मिळाल्याने त्यांच्या चेहर्यावर मोठा आनंद दिसून येत होता.
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com