प्रसिद्ध लेखिका प्रियांका कर्णिक यांच्या साहित्य प्रवासाने जिल्हा वाचनालयाच्या व्याख्यानमालेची सांगता
नगर : दर्शक ।
सांसारिक जबाबदाऱ्या पेलताना अवतीभवती असणारे मुलांचे विश्व जेव्हा त्यांच्या स्वतःच्या भाव विश्वात गुंतते तेव्हा घरातील गृहिणीला अधिक रिकामेपण जाणवायला लागते. या रिकामेपणातून आपण पहिल्यांदा मुलांसाठी लिखाण करताना मिळालेले प्रोत्साहन हे भविष्यातील माझ्या साहित्य विषयाला गवसणी घालणारा मैलाचा दगड ठरला असे प्रतिपादन प्रसिद्ध लेखिका सौ प्रियांका कर्णिक यांनी व्यक्त केले.
स्वतःच्या वाट्याला आलेला एकटेपणा व त्याचाच धागा पकडून स्री मनाचा ठाव घेणाऱ्या प्रियंका कर्णिक यांच्या साहित्य प्रवासातून उपस्थित नगरकर थक्क झाले.
जिल्हा वाचनालयात आयोजित वसंत व्याख्यानमालेचे तिसरे व शेवटचे पुष्प गुंफतांना "माझी साहित्यिक वाटचाल" या विषयावर त्यांनी उपस्थिताना मंत्रमुग्ध केले. यावेळी जिल्हा वाचनालयाचे अध्यक्ष प्रा शिरीष मोडक, उपाध्यक्ष दिलीप पांढरे ,संचालिका प्रा.ज्योती कुलकर्णी, शिल्पा रसाळ, किरण आगरवाल, ग्रंथपाल अमोल इथापे, सहाय्यक ग्रंथपाल नितीन भारताल,पल्लवी कुक्कडवाल उपस्थित होते.
लेखिका प्रियांका कर्णिक यांनी आपल्या साहित्य प्रवासाबद्दल अनेक घटना व्यक्ती भाव भावना यांचे संदर्भ दिले.आपल्याला आलेल्या तत्कालीन एकाकी पणाला धरून न बसता "मी पण हळवे" या ललित लेखन रुपी पुस्तकातून साहित्याला प्रारंभ झाला.
ही साहित्यकृती वाचकांना खूपच पसंतीस उतरली स्त्री च्या भावभावनांचा अविष्कार यातून हे पुस्तक त्यातील पात्र आपले वाटून गेले. यामधून मिळालेल्या प्रोत्साहातून पुढे "सावल्या" या स्त्री जीवनाचा ठाव घेणाऱ्या पुस्तकाची निर्मिती झाली.
स्त्री कितीही शिकली स्वावलंबी झाली तरी तिचे असुरक्षिततेचे भय मात्र संपत नाही. या पुस्तकांमध्ये वरवर लिखाण न करता चित्रकार, इंजिनिअर, उर्वी यासारखी पात्र साकारताना प्रत्यक्ष त्या ठिकाणी जाऊन त्यांचे जीवन समरसून अनुभवले, जगले व लिखाणात साकारले .त्यामुळे "सावल्या" साहित्यकृती लोकप्रिय ठरली व वाचकाना अचंबित करणारी ठरली अशा त्या म्हणाल्या
" पुरुषांची जीवन जगताना होणारे घुसमट, दुहेरी भूमिका ,मूल्यांचे पायी तुडवले जाणे ,यासारख्या असंख्य गोष्टी "शेखर" या नायकाच्या पात्राच्या माध्यमातून "मोक्ष" या पुस्तकातून मधून साकारताना एक वेगळ्याच विषयाची धाटणी मला साकारता आली. या सर्व साहित्यावर सुधीर गाडगीळ, साहित्य परिषदेचे अध्यक्ष मिलिंद जोशी यांनी केलेले साहित्य कलाकृतीचे परीक्षण, त्यावरील भाष्य व प्रोत्साहन यामुळे पुढील साहित्य वाटचालीस बळ मिळाले.
" भवचक्र हे आपल्या साहित्य विश्वातील मैलाचा दगड ठरलेल्या कादंबरीचा त्यामधील 500 ते 600 वर्षांचा प्रवास खूप वास्तववादी पणे मांडताना वाचक हे हेलावले. गोव्यातील धर्मांतरण आणि त्यातून झालेले अत्याचार याविषयी "हतबद्ध" या कथेपासून याला प्रारंभ झाला.
हाच धागा विस्तृतपणे साकारताना तत्कालीन समाजाची झालेली परवड, अन्याय त्यांचे स्थलांतर हा" मूर्तीच्या" प्रतीकात्मक स्वरूपात साकारता आला. छत्रपती शिवरायांनी आपल्या कुशाग्र रणनीतीतून पुढे आपला हा समाज सावरला असे सांगून हे कादंबरी वाचकांच्या हृदयाला हात घालणारी ठरली याचे समाधान आपल्याला वाटते अशा त्या म्हणाल्या.
रिकाम्यापनातून सुरू झालेल्या हा साहित्य प्रवास असाच रसिक वाचकांना वेगळ्या व संवेदनशील विश्वात घेऊन जाण्याचा माझा प्रयत्न आहे. नगर जिल्हा वाचनालयाने मला येथे बोलावून जे प्रोत्साहन दिले हा माझ्या आयुष्यातील अविस्मरणीय दिवस आहे अशा त्या शेवटी म्हणाल्या.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सत्कार अध्यक्ष प्रा शिरीष मोडक यांनी केला. परिचय संचालिका शिल्पा रसाळ, सूत्रसंचालन व आभार प्रा ज्योती कुलकर्णी यांनी मानले. वसंत व्याख्यानमालेच्या यशस्वीतेसाठी वाचनालयाचे सर्व संचालक मंडळ ,सभासद ,सदस्य, कर्मचारी यांचे बहुमूल्य सहकार्य लाभले.

टिप्पणी पोस्ट करा
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com